सर्वच म्हणतात ‘गृहखाते’ नको शरद पवारांचे नगरमध्ये स्पष्टीकरण : मंत्रीपदावरून कोणी नाराज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:15 PM2020-01-02T13:15:21+5:302020-01-02T13:21:36+5:30
अहमदनगर : महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रीपदावरून नाराज नाही. उलट मी अनेकांना गृहखाते हवे का, अशी विचारणा केली, परंतु कोणीच तयारी दर्शवली नाही. म्हणजे आमच्याकडे मंत्रिपद नको म्हणणारे अधिक आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी मिश्किल टिपण्णी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये केली.

जि. प.चे. माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पवार गुरूवारी सकाळी नगरमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्र्यांचा शपथविधी झाला, परंतु खातेवाटपास विलंब होत असल्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले, आज संध्याकाळी किंवा उद्या खातेवाटप पूर्ण होईल. खातेवाटप किंवा मंत्रीपदावरून सरकारमधील कोणत्याच पक्षात कोणीच नाराज नाही. हे सरकार तीन पक्षांचे असल्याने मंत्रीपदाचे वाटप सर्वांना करावे लागले, हे सर्वजण जाणतात. त्यामुळे कोणीही नाराज नाही. उलट आपण गृहमंत्री कोणाला हवे का? असे अनेकांना विचारले, परंतु कोणीच तयारी दर्शवली नाही. म्हणजे आमच्याकडे मंत्रीपद नको म्हणणारे लोक आहेत, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केल्यानंतर उपस्थितांत हशा पिकला. गृहमंत्रीपदाबाबत बोलताना मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. नगरमध्येही ज्या तालुक्याला अद्याप मंत्रीपद नव्हते, त्या राहुरी तालुक्याला राष्ट्रवादीने प्राधान्य दिले, असे पवार म्हणाले.
-------------
महाआघाडीचे अनेक राज्यांतून स्वागत
महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे इतर अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणाही झाली. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवे, असे सांगत पवार यांनी एकप्रकारे विरोधकांना इशाराच दिला.