‘जिनिव्हा’करारामुळे अभिनंदन परतला : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 07:33 PM2019-04-24T19:33:16+5:302019-04-24T19:34:24+5:30
आम्ही लष्करी हल्यांचे राजकारण कधीही केले नाही. उलट शहीद जवानांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका मांडली.
कोपरगाव : आम्ही लष्करी हल्यांचे राजकारण कधीही केले नाही. उलट शहीद जवानांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका मांडली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूकीत शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत. जखमी युध्दकैदी सापडल्यास त्याला परत करण्याचा विविध देशांचा ‘जिनिव्हा’करार झालेला आहे. म्हणून अभिनंदनची सुटका झाली. मात्र ३ वर्षांपासून कैदेत असलेल्या कुलभुषणची सुटका तुम्ही का करू शकले नाही? असा सवाल करून कॉंग्रेसमध्ये काही वाटा वेगळ्या झाल्या असतील. पण, आम्ही गांधी-नेहरूंचा विचार कधीच सोडला नाही, अशी स्पष्टोक्ती राष्टÑवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अशोक काळे,
पांडूरंग अभंग, अविनाश आदिक, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब गायकवाड, अरूण कडू, रावसाहेब म्हस्के, माधव खिलारी, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, गांधी कुटूंबाने लोकशाही राज्य स्थापन केले. ९० टक्के धरणांचा पाया जवाहरलाल नेहरूंनी रचला. कारखानदारी उभारली. इंदिरा गांधींनी पाकीस्तानला घुसखोरी थांबविण्यास भाग पाडले. बांगला देशाची निर्मिती केली. देशात इतिहास होतो. पण, त्यांनी भुगोल करून दाखविला. राजीव गांधींनी मोबाईल क्रांती केली. सामान्यांसाठी दळण-वळणाची साधने उपलब्ध केली. एकाच कुटूंबातील दोन कर्तृत्ववान माणसांच्या हत्या झालेल्या असताना गांधींनी काय केले? असे मोदी विचारतात. देशाचा पंतप्रधान गांधी-नेहरूंनंतर पवारांवर बोलतो, हे माझे भाग्य आहे. ते झोपेत सुध्दा माझे नाव घेत असतील, अशी टिपण्णी पवार यांनी केली. ते कधी पवारांचे बोट धरून राजकारण शिकलो असे म्हणतात. तर कधी पवार काय करीत आहेत? अशी विचारणा करतात. त्यांनी व्यक्तीगत टिका करण्याऐवजी पाच वर्षात काय केले व करणार? हे सांगावे, असे पवार यांनी ठणकावले. शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निर्यात करणारा देश आम्ही निर्माण केला. २०१७-१९ या दोन वर्षात देशात ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटूंबांची विचारपूस केली. शेतकरी कर्जमाफी केली. या सरकारने काय केले? भाजपच्या काळात बेकारी, बेरोजगारी वाढली, कारखानदारीचे धोरण आले नाही, शेतकरी उध्वस्त झाला. २०१४च्या पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा मोदींनी केली होती. त्याचे काय झाले? आम्ही राजकारणात नवीन पिढी तयार करीत आहोत. हा देश व राज्य पुढे नेणाºया तरूणांची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे राज्यकर्ते प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपयोगी पडणारे नाहीत. तर मुडदाड लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या ३ राज्यांचा निकाल देशातील लोकांची मन:स्थिती सांगणारा आहे. धाडी घालण्याचे काम या सरकारने करून सत्तेचा गैरवापर केल्याचे पवार म्हणाले. थोरात म्हणाले, १७ दिवसात निवडून आलेले सदाशिव लोखंडे चेंबूरला राहतात की चेंबरमध्ये? हेच कळत नाही. निळवंडे कालव्यांसाठी कुठलाही पैसा त्यांनी आणला नाही. भाऊसाहेब वाक्चौरेंनी एकदा पक्ष बदलला तर लोकांनी त्यांना पराभूत केले. आता चारदा बदलल्यावर काही खरे नाही. देशाचे पंतप्रधान कामांबाबत बोलत नाहीत. भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्था डबघाईस गेली. देशात मंदीची लाट आली. शेतकरी अडचणीत आल्याने बाजारपेठ उध्वस्त झाल्या, अशी टिका त्यांनी केली. उमेदवार भाऊसाहेब कांबळे, संदीप वर्पे, आशुतोष काळे, अभंग, मुरकुटे, ससाणे, आदिक आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन दीपक साळुंके यांनी केले.