पारनेरमध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:23 PM2019-10-08T17:23:36+5:302019-10-08T17:24:20+5:30
पारनेर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. तातडीने दुसरे हेलिकॉप्टर मागविले. त्यानंतर पवार जळगावकडे रवाना झाले.
पारनेर : पारनेर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. तातडीने दुसरे हेलिकॉप्टर मागविले. त्यानंतर पवार जळगावकडे रवाना झाले.
पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार पारनेर येथे आले होते. दुपारी २ वाजता सभा संपल्यानंतर जेवण करून पवार जळगावकडे रवाना होणार होते. दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकत नाही, असा निरोप देण्यात आला. याची माहिती मिळताच माजीमंत्री दिलीप वळसे पाटील, पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क करून दुसरे हेलिकॉप्टर पाठविण्याबाबत कंपनीस कळवले. यावेळी पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या हॉटेलवरच पवार यांना हेलिकॉप्टरची वाट पहात बसावे लागले. अखेर तीन वाजता दुसरे हेलिकॉप्टर आले. यानंतर पवार सव्वा तीन वाजता जळगावकडे रवाना झाले. यावेळी निलेश लंके, प्रशांत गायकवाड, सबाजी गायकवाड, बाबाजी तरटे, विक्रमसिंह कळमकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.