शरद पवार यांचा विरोध सिस्टीमला, कायद्याला नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:19+5:302020-12-31T04:21:19+5:30
अहमदनगर : शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, असे म्हटले जाते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र, शेतीवर म्हणजेच त्यांच्या ...
अहमदनगर : शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, असे म्हटले जाते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र, शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्यावरच राज्यसभेत चर्चा सुरू असताना पवार हे गैरहजर का राहिले, असा सवाल केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केला. अहमदनगरमध्ये बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना पटेल म्हणाले, शरद पवार यांचा कृषी विधेयक मांडण्याच्या सिस्टीमला विरोध आहे, विधेयकाला नाही. असा विरोध म्हणजे ‘कही पे निगाहे, कही पे निशाना’ असेच आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबत पटेल म्हणाले, कृषी विधेयकावरून पंजाब, हरियाणा सोडला तर भारतात कुठेच शेतकऱ्यांचा उद्रेक झाला नाही. जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात, तेव्हा आठ दिवस रस्ते बंद असतात; पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर नाहीत. उलट शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. केंद्रात मंजूर झालेल्या कृषी विधेयकांचा मसुदा पवार कृषिमंत्री असतानाच झाला आहे.
दिल्लीतील पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे एम.एस.पी. (पिकांचा किमान हमीभाव) चा कायदा लागू करा, या एकाच मागणीसाठी होते. तोपर्यंत या तीनही कृषी विधेयकांचे स्वागत जवळपास देशातील सर्व संघटनांनी केले होते. हमीभावाबाबत सरकार चर्चा करण्यास तयार झाल्यावर, याच दिल्लीतील आंदोलकांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. यामुळे आंदोलनात राजकारण सुरू झाले आहे. आंदोलनात शेती प्रश्नापासून भरकटलेली मंडळी आहेत, असेही पटेल यांनी सांगितले.