पक्षाचं नाव 'राष्ट्रवादी', पण शरद पवार देश तोडणाऱ्यांसोबत; मोदींचा पुन्हा 'स्ट्राईक'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:12 PM2019-04-12T12:12:09+5:302019-04-12T18:39:42+5:30
शरद पवार यांना नेमके झाले तरी काय? तुम्ही तर देशोसाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा का त्यांच्यासोबत गेला आहात. काश्मिरचे तुकडे तुम्ही होऊ देताल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांना विचारला.
अहमदनगर : शरद पवार यांना नेमके झाले आहे तरी काय? तुम्ही तर देशासाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा त्यांच्यासोबत का गेला? पक्षाचे नाव 'राष्ट्रवादी' ठेवले, पण देश तोडणाऱ्यांसोबत का गेला? काश्मीरचे तुकडे तुम्ही होऊ द्याल का? असे सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले आहेत.
अहमदनगर येथे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, अहमदनगरच्या भूमीने देश मजबूत केला आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक दिवस घोटाळ्याचा होता. काँग्रेसच्या काळात देशातील शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. आमच्या काळात आम्ही कठोर भूमिका घेतली. काँग्रेस सरकार जगात कमजोर होती. पाकिस्तानसमोर कमकुवत होती. मात्र आमचे सरकार आल्यानंतर दहशवादाविरोधात कठोर पावले उचलली. शरद पवारांना काय झाले आहे ? आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी असे आहे. तरीसुध्दा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील असूनही तुम्हाला झोप कशी येते, असा टोलाही पवारांना लगावला.
महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना पेन्शन मिळणार. नुकतेच आमच्या सरकारने पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ दिला. हा लाभ आता मत्स्यव्यावसायिकांनी मिळणार आहे. काँग्रेसला पूर्णपणे हटवा. त्यानंतरच देशाचा विकास होऊ शकतो, असा नागरिकांनीच प्रण केला आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार दिलीप गांधी यांनी नाराज होऊ नये. तुमच्यासाठी पक्ष काम करेल. सुजय विखे यांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.