‘त्या’ निभावताहेत आईची भूमिका; खरंच त्यांना सलाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:14+5:302021-05-09T04:21:14+5:30

लोणी : कोरोनाची दुसरी लाट अधिक विध्वंसक असल्याचे सिद्ध झाले आहे. परिणामी पुन्हा एकदा लॉकडाऊन लादण्यात आला. ...

‘She’ plays the role of mother; Really salute them ... | ‘त्या’ निभावताहेत आईची भूमिका; खरंच त्यांना सलाम...

‘त्या’ निभावताहेत आईची भूमिका; खरंच त्यांना सलाम...

लोणी : कोरोनाची दुसरी लाट अधिक विध्वंसक असल्याचे सिद्ध झाले आहे. परिणामी पुन्हा एकदा लॉकडाऊन लादण्यात आला. इतके निर्बंध लादलेले असतानादेखील लोक निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. या कठीण काळात महिला पोलीस, महिला डॉक्टर, आशा सेविका, परिचारिका या अतिशय खंबीरपणे या संकटाशी दोन हात करीत समाजासाठी ‘आई’ची भूमिका पार पाडत आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृ दिन साजरा केला जातो. यंदा ९ मे रोजी मातृ दिन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने समाजासाठी आईच्या मायेची भूमिका साकारणाऱ्या महिला पोलीस, डॉक्टर,

आशा सेविका, परिचारिका, होमगार्ड, महिला यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

कोरोनावर मात करण्यासाठी काही दिवस तरी हा लढा सामूहिकपणे लढला पाहिजे. यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा सूर या संवादातून उमटला.

............

समाजहित डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या नियमांचे कोरोनात काटेकोर पालन करून त्याची अंमलबजावणी केली, तसेच रुग्णालयातच नियमांचे उल्लंघन होत असल्यास वेळप्रसंगी आक्रमक होत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना समजावून सांगत आरोग्य सेवेचा लाभ समाजातील तळागाळातील नागरिकांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करताना खूप मानसिक समाधान लाभत आहे.

- डॉ. हर्षदा म्हस्के,

वैद्यकीय अधिकारी,

ग्रामीण रुग्णालय, लोणी.

...................

कोरोनाकाळात नाक्यानाक्यांवर होणारे जनसमुदाय रोखण्याचे काम जोखमीचे आहे. त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येतात. सकाळी घर सोडल्यानंतर रात्री येताना आपल्यामुळे कुटुंबाला कोरोना तर होणार नाही ना, अशी शंका यायची; पण नंतर मलाच कोरोनाने गाठले. योग्य काळजी घेतल्याने यावर मात करीत पुन्हा कामावर रुजू झाले. जे काम तू करशील ते प्रामाणिकपणे कर असा सल्ला माझे पती कायम देतात. या प्रोत्साहनामुळे मार्गदर्शनामुळे कोरोना काळात महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

- संगीता खेमनर, चणेगाव, ता. संगमनेर

पोलीस शिपाई, लोणी पोलीस ठाणे

............

ज्या समाजासाठी आम्ही राबतो तोच आपली कदर करीत नाही याचे खूप वाईट वाटले. सर्वेक्षणाचे काम करतानाही माहिती विचारायला गेल्यावर लोक सुरुवातीला तुसट भावनेने वागत, तर कधी स्वतःच्या घरातील आजारपणाबाबत माहिती लपवीत, बाजूचे आपल्या घरी येतील म्हणून दार बंद करायचे, पण समाजाची सेवा घेण्याचे व्रत स्वीकारले आहे म्हटल्यावर कौतुकापेक्षा अवहेलना वाट्याला येणारच, हे गृहीत धरून वाटचाल सुरू ठेवली. दिवसभर माहिती घेतल्यानंतर घरी परतल्यावर कुटुंबीयांना भेटताना दक्षता घ्यावी लागायची. समाजाने आम्हाला सुरुवातीला जवळ केले नाही; पण कुटुंबीयांनी कधी दूर लोटले नाही. त्यामुळे मी आजवरची लढाई जिंकू शकले.

- उज्ज्वला निर्मळ

आशा सेविका,

पिंपरी निर्मळ, ता.राहाता.

................

कोरोनाच्या महामारीतही माझ्यावर शासनाने टाकलेली जबाबदारी मी यशस्वीरीत्या पूर्ण करू शकले. यासाठी मला माझ्या कुटुंबातील सर्वांनीच मदत केली. त्यांच्यामुळेच मी दररोज घरातून बाहेर पडून प्रवास करू शकले. कुटुंबातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत कामी आली. समाजाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी अशीच कार्यरत राहणार आहे.

- देवयानी म्हंकाळे

शिक्षिका

वाकडी, ता. राहाता

...................

दोन्ही पायाने अपंग असतानाही मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज, शारीरिक अंतर ठेवून घरोघरी जात मी सर्वेक्षण केले. केवळ कोरोनाला हद्दपार करायचे आणि प्रत्येकाला वैद्यकीय मदत कशी मिळेल. हा एकच उद्देश डोळ्यासमोर होता. खात्याने थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर उपलब्ध करून दिले. खात्यातील अधिकाऱ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईत मीही खारीचा वाटा उचलत आहे, याचा मला अभिमान आहे.

-मंगल शिंदे,

अंगणवाडी सेविका,

खडकेवाके, ता. राहाता

.............

रुग्णालयातील एक परिचारिका अशी माझी ओळख होती. मात्र, या कोविडच्या कालावधीत रुग्णसेवेचे काम करू लागल्याने सामाजिकदृष्ट्या एक वेगळी ओळख मला मिळाली. नवी सामाजिक नाती निर्माण झाली. कोरोनाकाळातील कामामुळे कुटुंबातील सदस्यांना वेळ देता येत नसला तरी कोविडविरोधातील लढाईत रुग्णसेवेच्या माध्यमातून योगदान दिल्याचे समाधान आहे.

-सुनीता पवार,

परिचारिका,

प्राथमिक आरोग्य केंद्र,

अस्तगाव, ता. राहाता..

...............

कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून रुग्णांना सेवा दिली अशा शासकीय वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांचे ऋण फेडणे हे समाजातील जनतेचे महत्त्वाचे काम आहे. याच उदार भावनेच्या दृष्टिकोनातून यापुढेही कोरोना विषाणूच्या महामारीच्या संघर्षात अशा व्यक्तींना नेहमीच आपण पाठबळ देणार आहोत.

- माधुरी गाडेकर,

होमगार्ड पथक,

राहाता.

Web Title: ‘She’ plays the role of mother; Really salute them ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.