तिला मायेची उब हवी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 03:44 PM2020-03-08T15:44:22+5:302020-03-08T15:45:15+5:30

महिला दिन आला की हे अधिकाधिक चढाओढीने सुरु होते. हल्ली तर हा दिवस एक इव्हेन्ट म्हणूनही साजरा केला जातो ! महिलांच्या प्रति आदर व्यक्त व्हावा आणि तिला तिच्या आत्मसन्मानाची जाणीव व्हावी म्हणून ठिक आहे. पण हे आठ मार्च पुरतेच न उरता उरलेले तीनशे चौसष्ट दिवसही सुरु राहिलं तर त्या उद्घोषणा आणि तो आदर सार्थकी लागेल.

She wants the warmth of Maya ..! | तिला मायेची उब हवी..!

तिला मायेची उब हवी..!

महिला दिन विशेष/डॉ. सुचेता धामणे, महिला दिनानिमित्त अतिथी संपादक, लोकमत.
महिला दिनाच्या निमित्ताने सगळीकडे महिलांच्या सन्मानाच्या घोषणा सुरु असतात. महिला दिन आला की हे अधिकाधिक चढाओढीने सुरु होते. हल्ली तर हा दिवस एक इव्हेन्ट म्हणूनही साजरा केला जातो ! महिलांच्या प्रति आदर व्यक्त व्हावा आणि तिला तिच्या आत्मसन्मानाची जाणीव व्हावी म्हणून ठिक आहे. पण हे आठ मार्च पुरतेच न उरता उरलेले तीनशे चौसष्ट दिवसही सुरु राहिलं तर त्या उद्घोषणा आणि तो आदर सार्थकी लागेल. खरं तर समस्त महिलांच्या उध्दारास कारणीभूत ठरलेल्या सावित्रीबार्इंच्या त्यागाला आणि महिलेला माणूस म्हणून जगू देण्यासाठीच्या धडपडीला या दिवसाच्या निमित्ताने प्रणाम करणे गरजेचे आहे. समाजमनावर या माणूसपणाची छाप सोडणा-या मायेचे अनंत उपकार आहेत. 
आज स्त्री प्रतिष्ठेबद्दल आणि तिच्या विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारीबद्दल अहमहिका लागल्यासारखे बोलले जाते. तिला आरक्षण दिले, तिला बरोबरीचा सन्मान दिला गेला वैगरे खूप .... पण तिच्या आरक्षणापेक्षाही तिला सुरक्षेची अधिकाधिक गरज पडू लागली. हे कशाचे द्योतक आहे ? ज्या समाजात महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात त्याच समाजात दुसरीकडे आज इथली माय भगिनी कुठल्याच अर्थाने सुरक्षित नाही. अगदी एखाद्या तान्हुलीपासून तर नव्वदी पार केलेल्या आजीलाही इथल्या समाजाच्याच एका विकृत मनोवृत्तीकडून बलात्काराची शिकार होण्याची वेळ येते. कुणी त्यासाठी आमच्या आया बहिणींनाच जबाबदार धरून त्यांच्या पेहराव आणि वागण्याला नावे ठेवण्यात धन्यता मानतात. माऊलीच्या माध्यमातून रस्त्यावर जगणाºया मानसिक आणि शारीरिक संतुलन हरवलेल्या आया बहिणीसाठी काम करतांना हे पदोपदी जाणवते. ज्यांनी महिनोन महिने अंघोळ केलेली नसते,ज्यांच्या देहाचा घाणेरडा वास येत असतो, अंगावर कपडे नसतात, असले तरी फाटके, घाणेरडे असतात. त्या भगिनीही अनन्वित लैंगिक अत्याचारास बळी पडतात. इथे तर पेहराव आणि वागण्याचा काहीही सबंध नसतो. ज्या समाजात घरातील स्त्री सुरक्षित नाही तर अशा रस्त्यावर पोरके आयुष्य जगणाºया या आया बहिणीची काय अवस्था होत असेल, याची कल्पना न केलेली बरी ! मुळात इथली पुरुषी मानसिकता स्त्रीदेहाकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून बघणार असेल तर शेवटी हेच होणार. ही मानसिकता इथल्या व्यवस्थेत कधी बदलणार हा प्रश्न आहे. 
जो समाज स्वत:ला सुसंस्कृत म्हणवतो. जो समाज नवरात्रात आणि दिपावलीला स्त्री स्वरूपातील देवीची पूजा अर्चना करतो तोच समाज तिला उपभोग्य वस्तू मानून तिला माणूस म्हणूनही जगू देत नाही. त्या समाजाची उंची आणि खोली मोजण्याची गरज निर्माण झाली आहे.  संपन्न सुसंस्कृत समाजात नारीला मानाचे आणि आदराचे स्थान असते असे म्हणतात. असा समाज स्वत:ही बदलतो आणि त्या राष्ट्राचीही असामान्य प्रगती होते. कारण तिच्या घरातील असण्यातच घराचे घरपण सांधलेले असते. तिला फक्त मायेची उब आणि अथांग आकाश कवेत घेण्याचे बळ दिले आणि वास्तवात सन्मानाची वागणूक दिली तरी दरवर्षी नेमाने साज-या होणा-या महिला दिनाचे सार्थक होईल. ‘लोकमत’ने वेळोवेळी महिलांना आधार दिला व सन्मानही दिला. समाजाने महिलांप्रती आदर वाढविल्यास ती अधिक सक्षम होईल.
 

Web Title: She wants the warmth of Maya ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.