शेतक-यांना गाळ तर ठेकेदाराला वाळू : राज्यातील पाच धरणातील गाळ काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:29 PM2019-05-14T12:29:14+5:302019-05-14T12:29:24+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच राज्यातील पाच धरणातील गाळ काढण्याला प्रायोगिक तत्वावर सुरूवात होणार आहे़
भाऊसाहेब येवले
राहुरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच राज्यातील पाच धरणातील गाळ काढण्याला प्रायोगिक तत्वावर सुरूवात होणार आहे़ आधुनिक यांत्रिक बोटीने दहा वर्षात गाळ काढण्यात येणार आहे़ धरणामधून निघालेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. मिळालेल्या वाळूवर जलसंपदा विभागाला रॉयल्टी मिळणार आहे़ ई-टेंडर उघडल्यानंतर गाळ काढण्याला मुहूर्त मिळणार आहे़
२००९ मध्ये राज्यातील पाच धरणाची गाळ काढण्यासाठी निवड करण्यात आली होती़ महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने यासंदर्भात सर्व्हे केला होता़ त्यामध्ये मुळा, उजनी, जायकवाडी, गोसी खुर्द, गिरणा या धरणांचा समावेश होता़ या धरणातील गाळ काढण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर अन्य धरणातील गाळ काढण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे़जलसंपदा विभागाने ई-निविदा काढली आहे़ गाळ काढण्यासंदर्भात ठेकेदारांनी निविदा पाठविल्या आहेत़ लोकसभेच्या निवडणुकीमुळे निविदा पडून आहेत़ आचारसंहिता संपल्यानंतर पाचही धरणातील गाळ यांत्रिक बोटीच्या सहाय्याने काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे़ धरण प्रकल्प उभे राहिल्यानंतर धरणामध्ये अनेक वर्षापासून गाळ साचलेला आहे़ अशा स्वरूपाचा गाळ पहिल्यांदाच काढला जाणार आहे़धरणातून यांत्रिक बोटीव्दारे काढलेला गाळ शेतजमिनीला उपयुक्त ठरणार आहे़ शेतकरी उपलब्ध झालेला गाळ मोफत घेऊन जाऊ शकणार आहेत. गाळामधून वेगळी निघालेली वाळू ठेकेदाराला मिळणार आहे़ वाळूवर ठेकेदाराला रॉयल्टी भरावी लागणार आहे़ सदरहू रॉयल्टी जलसंपदा विभागाला मिळणार आहे़ जास्तीची बोली लावणाºया ठेकेदाराला गाळ काढण्याचे काम देण्यात येणार आहे़
मुळाचा एक टीएमसी पाणीसाठा वाढणार
मुळा धरणात १९७२ पासून पाणी साठविण्यास सुरूवात झाल्यानंतर ४६ घनमीटर गाळ साचला आहे. तो काढल्यानंतर १ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा पुनर्रस्थापित होण्यास मदत होणार आहे़
सध्या राज्यातील सर्व धरणाच्या पाणी साठ्याने सध्या तळ गाठलेला आहे़
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने मुळा धरणातील गाळाचा सर्व्हे केला आहे़ मुळाचा गाळ काढण्याचे काम दहा वर्ष चालणार आहे़ ई-निविदा प्राप्त झालेल्या आहेत़ आचारसंहिता उठल्यानंतर गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे़ त्यामुळे पाण्याचा साठा पुनर्रस्थापित होण्यास मदत होणार आहे़ - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर.