भेंड्यात मंदिरातील दानपेटी पळवली, सराफाचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:49 PM2019-11-18T13:49:01+5:302019-11-18T13:50:09+5:30
भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे रविवारी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घातला. चोरांनी ग्रामदैवत नागेबाबा मंदिरातील दानपेटी पळविली, तर नागेबाबा मंदिर रस्त्यावरील एका सराफाचे दुकान फोडले.
भेंडा : भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे रविवारी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घातला. चोरांनी ग्रामदैवत नागेबाबा मंदिरातील दानपेटी पळविली, तर नागेबाबा मंदिर रस्त्यावरील एका सराफाचे दुकान फोडले.
सोमवारी (दि.१८) पहाटे ३ वाजता पुजारी अशोक परशराम गव्हाणे व विलास शिरोळे हे मंदिरात साफसफाईसाठी आले होते. त्यावेळी त्यांना मंदिराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. मंदिरात पाहिले असता दानपेटी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ ही घटना मंदिर विश्वस्त व गावक-यांच्या निदर्शनास आणून दिली.
मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रविवारी रात्री १ वाजून १३ मिनिटांनी ६ चोरांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आणि सुमारे १५ मिनिटे मंदिरात असल्याचे स्पष्ट दिसते. यावेळी चोरांनी ३५ हजार रूपये किंमतीची दानपेटी व रक्कम अंदाजे ६५ हजार रूपये, असा १ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मागील महिन्यात दानपेटी उघडून त्यातील रक्कम बँकेत जमा केली होती. दुस-या घटनेत नागेबाबा मंदिर रस्त्यावर असलेले सागर पंडित यांच्या सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली. यात अडीच किलो चांदीचे दागिने अंदाजे एक लाख रूपयांचा माल चोरीला गेल्याची माहिती पंडित यांनी दिली.
नागेबाबा मंदिरातील दानपेटीच्या चोरीची तीन वर्षांनी पुनरावृत्ती झाली. यापूर्वी ४ आॅगस्ट २०१६ रोजी नागेबाबा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून अज्ञातांनी मंदिरातील दानपेटी, सीसीटीव्ही कॅमेरा मशीन (डीव्हीआर) व रोख रक्कम असा ८९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेचा अद्यापही तपास लागलेला नाही.