राज्यांतर्गत पीक स्पर्धेत शेवगावच्या शेतकऱ्याने पटकाविला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:16 AM2021-07-01T04:16:00+5:302021-07-01T04:16:00+5:30

दहिगावने : राज्य शासनाच्या पीक स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आबासाहेब निवृत्ती वावरे यांनी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, तर महेश ...

Shevgaon farmer bagged first position in inter-state crop competition | राज्यांतर्गत पीक स्पर्धेत शेवगावच्या शेतकऱ्याने पटकाविला प्रथम क्रमांक

राज्यांतर्गत पीक स्पर्धेत शेवगावच्या शेतकऱ्याने पटकाविला प्रथम क्रमांक

दहिगावने : राज्य शासनाच्या पीक स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आबासाहेब निवृत्ती वावरे यांनी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, तर महेश चंद्रकांत म्हस्के यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात आली.

या स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील वरूर येथील प्रगतशील शेतकरी आबासाहेब वावरे यांनी सहभाग घेत रब्बी हंगामात आपल्या चार एकर शेतात हरभरा पीक घेतले. त्यांनी हरभऱ्याच्या जॅकी वाणाची चार एकरांवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. एकरी २० किलो बियाणे वापरले. पेरणीवेळी एकरी १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य पेरली. 'उदासी तंत्रज्ञानाचा' प्रामुख्याने वापर केला. कीटक नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी केली. रासायनिक खते व कीटकनाशकांचाही गरजेप्रमाणे वापर केला. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत हेक्टरी ३१ क्विंटल उत्पन्न मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ, कृषी पर्यवेक्षक प्रवीण काजळे, कृषी सहायक सुवर्णा मुरदारे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

--

या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे आलेली उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेच्या दीड पट किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते. त्यातून राज्यविभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीस देण्यात येते. पुढील वेळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे.

-किरण मोरे,

तालुका कृषी अधिकारी, शेवगाव

---

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने विविध प्रयोग शेतात राबविल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. कोणत्याही पिकाच्या लागवडीचा / पेरणीचा कालावधी महत्त्वाचा असतो. तो चुकू दिला नाही तर उत्पन्नात हमखास वाढ होते.

-आबासाहेब वावरे,

प्रगतशील शेतकरी, शेवगाव

---

३० आबासाहेब वावरे

Web Title: Shevgaon farmer bagged first position in inter-state crop competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.