शेवगाव-पाथर्डी : मोनिका राजळेंचे प्रयत्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 07:07 PM2019-05-24T19:07:56+5:302019-05-24T19:09:41+5:30

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती.

Shevgaon-Pathardi: Monica Rajlee's efforts succeed | शेवगाव-पाथर्डी : मोनिका राजळेंचे प्रयत्न यशस्वी

शेवगाव-पाथर्डी : मोनिका राजळेंचे प्रयत्न यशस्वी

उमेश कुलकर्णी
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती. परंतु त्यावेळेस मतदारसंघातील घुले-ढाकणे-राजळे ही तिन्ही घराणी राष्ट्रवादीसोबत होती. पण यावेळेस आमदार मोनिका राजळे या भाजपत होत्या. त्यांनी निवडणुकीत घेतलेले अपार कष्ट तसेच त्यांना मिळालेली विखेंची साथ यामुळेच भाजपच्या डॉ. सुजय विखे यांना शेवगाव-पाथर्डीत चांगले मताधिक्य मिळाले. जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व त्यांचा जनशक्ती मंच ऐनवेळी राष्टÑवादीच्या तंबूत उतरला असला तरी मतदारसंघातील जनतेने मात्र भाजपला साथ दिली.
शेवगांव-पाथर्डी मतदारसंघावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे प्रभुत्व आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार राजळे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवित ‘न भुतो न भविष्यती’ असा विजय संपादन केला. त्यांनी आमदार झाल्यापासून मतदारसंघात केलेली जलसंधारणाची कामे तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांशी ठेवलेला संपर्क तसेच विखे यांनी गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जोडलेली माणसे यामुळे विखेंना लोकसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळाले. सुजय विखे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांची सुद्धा मोठी साथ लाभल्याचे निकालावरून दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दिवंगत राजीव राजळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. त्यांच्या साथीला माजी आमदार चंद्रशेखर घुले व केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे होते. या तिन्ही नेत्यांनी मिळून नरेंद्र मोदींची लाट काही प्रमाणात मतदारसंघात रोखून धरली होती. परंतु यावेळी मतदारसंघात राष्ट्रवादी पार गारद झाली. भाजप व मोदी हे शेतकरी विरोधी आहेत, असा प्रचार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून झाला परंतु मतदारांनी मात्र याला सफसेल नाकारले.
विखेंच्या विजयामुळे राजळे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी ताकद मिळणार आहे. त्यातून राष्टÑवादीचे शेवगावातील घुले बंधू व पाथर्डीतील प्रताप ढाकणे यांचा सामना करणे सोपे होणार आहे.

विधानसभेला राजळेंना मुंडेंसोबत विखेंची साथ
मागील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी आमदार राजळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या साथीने अर्धा लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. आता विखेंची ताकद व राजळेंचा जनसंपर्क यामुळे विरोधकांना मोठया निकराने प्रयत्न करावे लागणार आहेत.

की फॅक्टर काय ठरला?
राष्ट्रवादी काँग्रेस आकडेवारीत रमत असताना या पक्षाचे शरद पवार वगळता इतर नेते मंडळी मात्र मतदारांपुढे विश्वासाने सामोरे गेले नाहीत.

भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष असल्याचा राष्ट्रवादीचा प्रचार मतदारांना पटला नाही. मतदार संघाबाबत कोणताही ठोस मुद्दा राष्ट्रवादीने मांडला नाही.

भाजपने नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली. अनेक नेत्यांना विखे यांनी एकत्रीत आणले.

 

Web Title: Shevgaon-Pathardi: Monica Rajlee's efforts succeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.