शेवगाव तालुक्यात १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ८१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 08:21 PM2017-10-07T20:21:11+5:302017-10-07T20:21:11+5:30
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान झाले. तालुक्यात सरासरी ८१ टक्के मतदान झाले. रावतळे - कुरुडगाव येथे सर्वाधिक ९२.३३ टक्के तर दहिगावने येथे सर्वात कमी ७१.७० टक्के मतदान झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान झाले. तालुक्यात सरासरी ८१ टक्के मतदान झाले. रावतळे - कुरुडगाव येथे सर्वाधिक ९२.३३ टक्के तर दहिगावने येथे सर्वात कमी ७१.७० टक्के मतदान झाले. तालुक्यातील ११ हजार १८४ महिला व १२ हजार ०८८ पुरुष अशा २३ हजार २७२ मतदारांपैकी १८ हजार ८२६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यंदा थेट जनतेतून होणा-या सरपंच पदाच्या निवडणुकीमुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. सरपंच पदासाठी ४७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने निवडणुका होणा-या प्रत्येक गावचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग कमी राहिला. तालुक्यात सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातून सांगण्यात आली.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या दहीगाव ने येथे माजी आमदार नरेंद्र घुले , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायतीवर आपल्या समर्थकास संधी मिळावी यासाठी अनेक गावातील मातब्बर नेते मंडळी दिवसभर आपल्या गावातील मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते.
तालुक्यातील मतदानाची टक्केवारी
रावतळे - कुरुडगाव ९२.३३ टक्के
भायगाव ८८.७७
खामगाव ८८.५५
वाघोली ८७.०६
प्रभूवाडगाव ८६.८७
रांजणी ८५.२३
अमरापूर ८४.१०
सुलतानपूर खुर्द ८२.९५
खानापूर ८२.८३
आखेगाव ८१.७५
जोहरापूर ८०.८५
दहिगाव ने ७१.३०