शिर्डी विमानतळचे उद्घाटन काकडीकरांनी पाहिले दुरून; विमानतळाच्या दारातच प्रशासनाने अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 04:09 PM2017-10-01T16:09:31+5:302017-10-01T16:09:45+5:30
ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन शिर्डी विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अस्तगाव : शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी १० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. परंतु ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.
काकडी गावातील सुमारे ७६४ शेतकरी खातेदारांच्या जमिनी विमानतळात गेल्या आहेत. विमानतळात जमीन गेलेल्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला विमानतळात नोकरी दिली जाईल, असे आश्वासन विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्यात झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. आंदोलने, उपोषणे झाली. परंतु अजूनही या गावातील थोडक्याच नागरिकांना नोकºया मिळाल्या आहेत. तर अनेक नागरिक अजून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना नोक-या मिळाल्या त्यांनाही कनिष्ठ दर्जाचे काम मिळाल्यामुळे विमानतळात घेतलेले कामगारही निराश आहेत. तसेच काकडी गावच्या सरपंच नानुबाई विनायक सोनवणे यांनाच कसेबसे उद्घाटनादरम्यान आत सोडण्यात आले. गावातील काही ठराविक नागरिकांना पास दिले असतानाही आत सोडण्यात आले नाही. काकडी गावातील अनेक नागरिकांना पास दिले नाहीत, पण मुख्य प्रवेशद्वाराशेजारीही फिरकू दिले नाही. आपल्याच शेतात येऊन आपल्यावर विमान प्राधिकरणाने गाजवलेला अधिकार नागरिकांनी अनुभवला. राष्ट्रपतींचा ताफा शिर्डीच्या दिशेने गेल्यानंतर आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना हुसकून लावले. त्यामुळे काकडी गाव अस्वस्थ होते.
विमानतळ उद्घाटनादरम्यान काकडी गावातील कुणालाही आत सोडण्यात आले नाही. फक्त मला सोडण्यात आले. उद्घाटन होऊन गेले आता काय करणार. भूमिपूजनानंतर आठ वर्षे होऊन गेले गाव एकत्र राहिले नाही. आता आपले काय चालणार. राष्ट्रपतींसोबत बोलण्यास परवानगी मिळाली नाही. जमिनी जाऊन काही फायदा गावाला झाला नाही.
-नानुबाई विनायक सोनवणे, सरपंच, काकडी.