शिर्डी मतदारसंघ पाणीदार करणार : सदाशिव लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 04:47 PM2019-04-28T16:47:58+5:302019-04-28T16:49:32+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला.
शिवाजी पवार
श्रीरामपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला. त्यांच्याच पापामुळे मराठवाड्याला पाणी देण्याची वेळ आली आहे. घाटमाथ्यावरून समुद्राला वाहून जाणारे ६० टीएमसी पाणी प्रवरा व गोदावरी खोऱ्यात वळवून येथील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुढील पाच वर्षात प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारी येथे झालेल्या सभेसाठी आले असता लोखंडे यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, अशोक थोरे हे उपस्थित होते. लोखंडे यांनी अनेक मुद्यांवर दिलखुलास संवाद साधला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. लोखंडे म्हणाले, आघाडी सरकारने जरी निळवंडे धरण पूर्णत्वाला नेले असले तरी तेवढे पुरेसे नाही. जोपर्यंत शेतात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत त्या कामाला काहीही अर्थ नाही. आपण केंद्र सरकारकडून धरणाला मंजुरी मिळवून देत कालव्याच्या कामांना चालना दिली. मतदारसंघातील पूर्वेकडील श्रीरामपूर, नेवासे, राहुरीच्या काही भागाच्या पाण्याचाही आपण विचार केला आहे. घाटमाथ्यावरचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक आहेत. हा प्रकल्प झाल्यास नगरसह मराठवाड्याचाही पाणी प्रश्न सुटणार आहे. मतदारसंघात आपण कृषी उत्पादक कंपन्या सुरू केल्या. त्यामुळे शेती उद्योगाला चांगले दिवस येतील. देशात शिर्डीसाठी या कंपन्या मंजूर करून आणल्या. ही संधी फार थोड्या खासदारांना मिळाली, असे लोखंडे म्हणाले.
प्रत्येक तालुक्यात विकासाचा समतोल साधला
श्रीरामपुरच्या टपाल कार्यालयात नुकतेच पासपोर्ट कार्यालय सुरू केले. त्यामुळे येथील तरूणांना परदेशात जाता येणार आहे. देशात फार मोजक्याच ठिकाणी ही मंजुरी मिळाली आहे.
विकास करताना मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षासाठी माझ्या चांगल्या योजना आहेत, असे ते म्हणाले.
विरोधी उमेदवाराचा प्रशासनावर वचक नाही. त्यांच्याकडून कामे होत नाहीत. हे सर्व जनतेला माहीत आहे. माझ्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे, असे लोखंडे यांनी सांगितले.