शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्कावर भर : भाऊसाहेब कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 04:51 PM2019-04-28T16:51:12+5:302019-04-28T16:52:13+5:30
शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्क रुजविण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्याचा संकल्प काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे.
श्रीरामपूर : शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्क रुजविण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्याचा संकल्प काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे. नागरिकांना सहजासहजी उपलब्ध होणारा खासदार अशी ओळख निर्माण करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
गुरूवारी दत्तनगर, खंडाळा, राजुरी आदी गावांच्या प्रचार दौऱ्यात कांबळे यांनी ‘लोकमत’ शी दिलखुलास संवाद साधताना मतदारसंघाच्या विकासाविषयीच्या कल्पना मांडल्या. दहा वर्षे विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे व निभावलेली भूमिका त्यांनी सांगितली.
कांबळे म्हणाले, विरोधी उमेदवारांनी निवडून आल्यानंतर या मतदारसंघात मतदारांचे साधे आभारही मानले नाहीत. आजही अनेक लोक त्यांना ओळखत नाहीत. जनतेच्या सुख-दु:खात त्यांच्या अडीअडचणीच्या काळात लोकप्रतिनिधीला नेहमीच सहभागी व्हावे लागते.
शिर्डी मतदारसंघ हा अत्यंत जागृत आहे. येथील लोकांच्या अनेक अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील. गेली दहा वर्षे श्रीरामपूरचा आमदार म्हणून काम पहात आहे.
नगरसेवकापासून आपण राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. जनतेशी नेहमीच नाळ जोडलेली आहे. सकाळी सात वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कोणत्याही
माणसाला भेटण्यासाठी मी उपलब्ध राहतो.
श्रीरामपुरातील मुख्य प्रशासकीय इमारत, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारती आपण उभ्या केल्या. नगरपालिकेला निधी देण्यात नेहमीच मोकळा हात राहिला. देवळाली परिसरातील गावांच्या विकासातही निधी दिला.
श्रीरामपूर मतदारसंघातील ८४ गावे व दोन नगरपालिकांचे कार्यक्षेत्र सांभाळत आलो आहे. राहुरी तालुक्यातील गावांवरही कधी अन्याय होऊ दिला नाही.
सर्वांनाच निधी देण्याचे काम केले. हाच अनुभव लोकसभेसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.
रोजगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
च्मतदारसंघातील पाणी प्रश्न, एमआयडीसीतील उद्योगांना चालना देण्याचा प्रश्न सोडविण्यावर माझा भर राहील. शेतकºयांच्या प्रश्नांप्रती अधिक गंभीर आहे. खासदार म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करील असे कांबळे म्हणाले.