शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी बनावट पास विक्री उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:07 PM2018-01-28T22:07:30+5:302018-01-29T14:48:46+5:30
गर्दीच्या काळात बनावट व्हीआयपी दर्शन पास तयार करून संस्थान व भाविकांची फसवणूक करणा-या दोघांना संस्थान व पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे़ या आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
शिर्डी : गर्दीच्या काळात बनावट व्हीआयपी दर्शन पास तयार करून संस्थान व भाविकांची फसवणूक करणा-या दोघांना संस्थान व पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे़ या आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
झटपट दर्शन होण्यासाठी संस्थानकडून स:शुल्क पासेस दिले जातात. दर्शनासाठी प्रत्येकी दोनशे रुपये आकारण्यात येतात़ अनेक भाविक हे पासेस आॅनलाइनवरही काढतात. गर्दीच्या काळात अनेक भामटे बनावट पास करून भाविकांना विकतात. हा गोरखधंदा सध्या तेजीत होता़ काही पास प्रवेशद्वारात स्कॅन होत नसल्याने हे पास बनावट असल्याचे समोर आले़ भाविकांच्या मदतीने संबंधित इसमांची माहिती काढून मंदिर विभागाचे पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक डॉ़ सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी मंदिर परिसरात सापळा लावला. संशयितांकडे पास घेण्यासाठी बनावट साईभक्त पाठविण्यात आला़ यात विजय गणेश वाडेकर (वय ३५), रवींद्र सुखदेव रणदिवे (वय २४, दोघेही रा. लक्ष्मीनगर) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बनावट पासेसही ताब्यात घेण्यात आले. या दोघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासात एक मोठे रॅकेट उघडकीस येईल, असा पोलिसांना विश्वास आहे़
आरोपींकडून आठ हजार आठशे रुपयांचे बनावट पास जप्त करण्यात आले आहेत़ २६ जानेवारी रोजी दहा भक्तांना प्रत्येकी दोनशे रुपयांनुसार बनावट पास विकले होते़ स्कॅनिंग करताना पास बनावट असल्याचे लक्षात आले होते़ त्यावरून संस्थानच्या सुरक्षारक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग यांची टीम तयार करून सापळा रचण्यात आला होता.
-आनंद भोईटे, पोलीस उपाधीक्षक, साईमंदिर