शिर्डीत शासकीय पाण्याची चोरी : एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 04:52 PM2019-07-06T16:52:04+5:302019-07-06T16:52:08+5:30
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्डी नगरपंचायतीच्या साठवण तलावाला खासगी विहिरीतून आडवे बोअर मारुन पाणी चोरणाºयाचा प्रताप उघडकीस आला असून
शिर्डी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्डी नगरपंचायतीच्या साठवण तलावाला खासगी विहिरीतून आडवे बोअर मारुन पाणी चोरणाºयाचा प्रताप उघडकीस आला असून, या पाणी चोराला नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे़ या पाणी चोरणाराच्या विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे़
या घटनेनंतर नगरपंचायतीने तलावाची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. आणखी दोन विहिरीतून अशाच प्रकारे आडवे बोअर मारल्याचे समोर आले आहे़ या प्रकारामुळे नगरपंचायतीचा तलाव कोरडा पडला आहे. यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे़
नगरपंचायतीने १९८३ साली हा तलाव बांधला़ नगरपंचायतीने काही वर्षापूर्वी कनकुरी रोडला आणखी एक तलाव बांधला असला तरी या तलावातून शहरातील काही भागाला पाणी पुरवठा केला जातो़ यावेळी साठवण तलाव नेहमीपेक्षा लवकर कोरडा झाल्याने नगरपंचायत कर्मचाºयांना संशय आला़ त्यांनी बारकाईने तपास केल्यानंतर तलावापासून जवळपास दीडशे फुटावर असलेल्या विठ्ठल तबाजी दाभाडे यांनी आपल्या विहिरीतून थेट तलावाच्या खालील भागात आडवे बोअर मारून होल पाडल्याचे लक्षात आल्याने अधिकारी चक्रावून गेले़
याबाबत कर्मचाºयांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांना माहिती दिली असता त्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून तलावातील पाणी तस्करीबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले़ त्यानुसार नगरपंचायत कर्मचारी सर्जेराव कांबळे यांनी पोलिसात दाभाडे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली़ पोलिसांनी दाभाडे यांना अटक केली आहे़
शिर्डी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. खूप परिश्रमपूर्वक शहराची पाणी समस्या सोडवण्यात आली आहे़ त्यामुळे अशा घटना घडल्यास कठोर कारवाई करावी लागेल - सतीश दिघे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, शिर्डी.
सार्वजनिक पाणी चोरीचा प्रकार धक्कादायक व निंदनीय आहे. त्या विरोधात कारवाई करणाºया प्रशासनाच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत़ -अर्चना कोते, नगराध्यक्ष, शिर्डी.