शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:47 AM2018-02-20T04:47:55+5:302018-02-20T04:47:57+5:30
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे (६०) यांचे सोमवारी पहाटे श्रीरामपूर येथे निधन झाले.
अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे (६०) यांचे सोमवारी पहाटे श्रीरामपूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
ससाणे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजाराशी संबंधित उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात आई मालूताई, पत्नी तथा माजी नगराध्यक्षा राजश्री, मुलगा व श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण, स्नुषा दीपाली असा परिवार आहे.
ससाणे हे १९८५ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. ससाणे १९९९ ते २००९ श्रीरामपूरचे आमदार होते. १५ वर्षे ते नगराध्यक्षपदी होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. साई संस्थानचा कायापालट राज्य सरकारने २००४ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली साई संस्थान विश्वस्त मंडळाची स्थापना केली़ आठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी द्वारावती, साई आश्रम, आशिया खंडातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचे सर्वांत मोठे प्रसादालय, सोलर प्रकल्प उभे केले. भक्तांच्या दृष्टीने हितकारी निर्णय घेतले़ २३ डिसेंबर २००७ रोजी मंदिरात साईभक्तांच्या देणगीतून सुवर्ण सिंहासन बसविले़ साईबाबा रुग्णालयात स्पेशालिटी सुविधा वाढवून हृदय शस्त्रक्रिया सुरू झाल्या़