शेजा-याचे मूल चोरणा-या दाम्पत्याला शिर्डी पोलिसांनी केली मुंबईतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 08:14 PM2018-01-15T20:14:58+5:302018-01-15T20:15:32+5:30
आपल्याला मुल होत नसल्याने शेजारचे नवजात मूल चोरून आई-बाप बनण्याचे स्वप्न पाहणा-या एका दाम्पत्याला शिर्डी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
शिर्डी : आपल्याला मुल होत नसल्याने शेजारचे नवजात मूल चोरून आई-बाप बनण्याचे स्वप्न पाहणा-या एका दाम्पत्याला शिर्डी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
शिर्डीलगत असणा-या शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या चारी लगत बाबर व गोंडगिरे हे कुटूंब एकमेकांचे चांगले शेजारी होते. दोन्हीही कुटूंबे साईबाबांच्या मुर्त्या विकून चरितार्थ चालवतात़ संजीव हरीभाऊ गोंडगिरे यांना एक साडेतीन वर्षाची मुलगी आहे. त्यांना नुकताच एक मुलगा झाला. ३ जानेवारी रोजी गोंडगिरे यांचे शेजारी असलेल्या सुरेश बाबर व पुजा बाबर यांनी गोंडगिरे यांचा पाच वर्षाचा मुलगा चोरुन शिर्डीतून पलायन केले. आपलं मुल म्हणून याला वाढवू व कोठेही काम करून चरितार्थ चालवू या कल्पनेने या दाम्पत्याने चेंबूर गाठले. दरम्यान संजीव गोंडगिरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा लोकडे, पोलीस नाईक प्रशांत दिनकर, किरण कु-हे, राजेंद्र बर्डे यांच्या पथकाने बाबर दाम्पत्याला मुलासह काल ताब्यात घेतले. यामुळे पुजा बाबर यांचा आई होण्याचा आनंद क्षणिक ठरला. अकरा दिवसांचे त्यांचे मातृत्वही संपुष्टात आले. आरोपी व बाळाला शिर्डीत आणण्यात आले असून आरोपींची रवानगी कोठडीत करण्यात आली. तर बालकाला त्याच्या आईकडे सोपविण्यात आल्याचे इंगळे यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षा लोकडे करीत आहे.