शिर्डीत वाहने अडवून लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:25 PM2018-04-12T17:25:01+5:302018-04-12T17:26:24+5:30
कोपरगाव ते पोहेगाव मार्गे संगमनेर जाणाऱ्या वाहनांना निर्जनस्थळी अडवून, त्यांना मारहाण करून लुटणा-या दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.
शिर्डी : कोपरगाव ते पोहेगाव मार्गे संगमनेर जाणाऱ्या वाहनांना निर्जनस्थळी अडवून, त्यांना मारहाण करून लुटणा-या दोघांना शिर्डीपोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.
संदीप ताराचंद वायकर (वय २३, रा. सोनेवाडी, ता. राहाता) व अमोल बाळासाहेब जाधव (वय १९ रा. मानोरी, ता. राहुरी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २५ मार्चला सुखवीर लठवाल ( रा. सोनीपथ, हरियाणा) हे त्यांच्या मालकीची टाटा कंपनीचा टेम्पो (क्रमांक एनएल़०१ एल ४३२५) घेऊन संगमनेरकडे जात होते. रात्री साडे दहाच्या सुमारास बहादराबाद फाट्याजवळ त्यांचा टेम्पो अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रूपये घेऊन चोरटे फरार झाले होते. याबाबत शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी फौजदार जगदिश मुलगीर, सहायक फौजदार नाना शेंडगे, पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे आदींच्या पथकाने साध्या वेशात या मार्गावर रात्री गस्त घालून या आरोपींना अटक केली. चोरलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटार सायकल असा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींचा अन्य कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे?, याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.