साईंच्या खजिन्यातून दसऱ्याला चांदीची लयलूट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:29 PM2018-10-18T22:29:56+5:302018-10-18T22:33:14+5:30
फकीर असलेल्या साईबाबांच्या खजिन्यातून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पावणे दोन कोटी रुपयांच्या चांदीची लयलूट करण्यात आली.
- मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर - फकीर असलेल्या साईबाबांच्या खजिन्यातून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पावणे दोन कोटी रुपयांच्या चांदीची लयलूट करण्यात आली. साई समाधी वर्षानिमित्त साईबाबा संस्थानने संस्थानचे कायम नोकरीत असलेले कर्मचारी व अधिकारी यांना तसेच संस्थानचे विश्वस्त, माजी विश्वस्त, मान्यवर यांना साई प्रतिमा असलेले प्रत्येकी पंचवीस ग्रॅम वजनाची चांदीची नाणी सप्रेम भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी, अधिकाऱ्यांनादेखील ही नाणी देण्यात येणार आहेत. मात्र कंत्राटी कामगारांना बाबांचा हा चांदीचा प्रसाद मिळणार नाही.
खरेदी केलेल्या नाण्यांपैकी उर्वरित नाणी साई भक्तांना खरेदी मूल्यावर प्रसाद रूपाने विक्री करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण दहा हजार नग चांदीची नाणी भारत सरकारच्या मुंबई येथील टंकसाळीकडून खरेदी करण्यात येणार आहेत. २२ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या सभेत हा निर्णय घेऊन तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने दसऱ्याच्या पूर्वसंध्येस या निर्णयास मंजुरी देणारा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार संस्थानच्या तिजोरीतून एक कोटी चौऱ्यांशी लाख सत्तर हजार रुपये खर्चास शासन मान्यता देण्यात आली आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १९ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यासाठी शिर्डीत येत आहेत. याचवेळी या चांदीच्या नाण्यांचा वाटप शुभारंभ होण्याची शक्यता आहे.