शिर्डीच्या पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:57 PM2018-05-03T15:57:27+5:302018-05-03T15:57:48+5:30
२०११ मध्ये शिर्डीत प्रवीण गोंदकर व रचित पाटणी या दोन तरूणांची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपावरून पाप्या शेखसह १२ जणांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २४ पैकी १२ आरोपींना निर्दोष ठरविण्यात आले.
अहमदनगर : २०११ मध्ये शिर्डीत प्रवीण गोंदकर व रचित पाटणी या दोन तरूणांची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपावरून पाप्या शेखसह १२ जणांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २४ पैकी १२ आरोपींना निर्दोष ठरविण्यात आले.
शिर्डीतील पाकीटमार व इतर गुन्हेगारी टोळ्यांचा प्रमुख असलेला पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (वय ३२, रा. कालिकानगर, शिर्डी) याच्यासह त्याच्या टोळीतील २४ गुंडांविरूद्ध गोंदकर व पाटणी हत्या प्रकरणात गुन्हा दाखल होता. या सर्वांविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात सुरू होती. बुधवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी विशेष न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला.
१४ व १५ जून २०११ च्या रात्री संशयितांनी विलास पंढरीनाथ गोंदकर (वय ४७, रा. बिरेगावरोड, शिर्डी, जि. अहमदनगर) यांचा मुलगा प्रवीण व त्याचा मित्र रचित पाटणी या दोघांना खंडणीसाठी व तडजोडीसाठी सुरभि हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर प्रवीण व रचित यांना स्कॉर्पिओ वाहनातून पळवून नेऊन नेऊन निमगाव येथील वाल्मिक पावलस जगताप यांच्या शेतात नेऊन त्यांना रात्रभर मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार केले. आरोपींनी प्रवीण व रचित यांना अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडून त्यांची छायाचित्रेही काढली. या सर्व प्रकारात या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नग्नावस्थेतील मृतदेह शिर्डीतील हॉटेल पुष्पांजलीसमोर नेऊन टाकली.
याप्रकरणी पाप्या शेखसह त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणी, अपहरण व खुनाचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. श्रीरामपूरचे तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या प्रकरणाचा तपास करून २४ पैकी २३ आरोपींना अटक केली. यात पाप्या शेख याचा प्रमुख सहभाग असल्याचे समोर आले. त्याच्यासह त्याच्या साथीदारांविरूद्ध विविध प्रकारचे २२ गुन्हे दाखल असल्याने या सर्वांविरूद्ध ‘मोक्का’नुसार कारवाई करण्यात आली. त्यानंतर शिर्डीतील गुन्हेगारीस मोठ्या प्रमाणात आळा बसला.
नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात चाललेल्या या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम व अॅड. अजय मिसर यांची नियुक्ती झाली होती. निकम यांनी दोन, तर मिसर यांनी ४३ साक्षीदार तपासले.
जन्मठेप झालेले आरोपी
सलीम उर्फ पाप्या ख्वाजा शेख, विनोद सुभाष जाधव, सागर मोतीराम शिंदे, सुनील ज्ञानदेव लहारे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे, माउली उर्फ ज्ञानेश्वर शिवनाथ गुंजाळ, गणी मेहबूब सय्यद, समीर उर्फ चिंग्या निजाम पठाण, रहीम मुनावर पठाण, सागर शिवाजी काळे, निलेश देवीलाल चिकसे, निसार कादीर शेख.