आढळगावच्या सरपंच निवडीत शिवप्रसाद उबाळेंचे पारडे जड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:43+5:302021-02-09T04:23:43+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होण्यापूर्वीच सदस्य सहलीला रवाना ...
आढळगाव :
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होण्यापूर्वीच सदस्य सहलीला रवाना झाले होते. गेली पंधरा दिवस सदस्यांची सहल अन् घोडेबाजार तालुक्यात चर्चेचा विषय बनला होता. गणित जुळविण्यात यशस्वी झाल्यामुळे सरपंच निवडीमध्ये शिवप्रसाद उबाळे यांचे पारडे जड झाले आहे.
येथे पाच प्रभागामध्ये तेरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उत्तम राऊत यांच्या गटाला सहा जागा, शिवप्रसाद उबाळे यांच्या गटाला चार जागा, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या गटाला दोन जागा तर दहा वर्षे आपल्याच घरात सरपंचपद ठेवणाऱ्या देवराव वाकडे यांना फक्त एक जागा असा त्रिशंकू कौल मतदारांनी दिला.
सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होण्यापूर्वीच शिवप्रसाद उबाळे यांनी आपल्या गटाच्या चार सदस्यांसह अन्य गटाचे दोन सदस्य घेऊन गाव सोडले. ऐन प्रजासत्ताक दिनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ‘गायब’ झाल्यामुळे तालुकाभर चर्चेचा विषय बनला. सुरुवातीपासून तटस्थ असलेल्या देवराव वाकडे यांना गळाला लावत काठावरचे बहुमत गाठले. परंतु, त्यानंतर सरपंच आणि उपसरपंचपदासाठी अन्य दावेदार तयार झाल्यानंतर उबाळे गटामध्ये चलबिचल सुरू झाली आणि हाती आलेले बहुमत निसटण्याची शक्यता निर्माण झाली. उत्तम राऊत यांनी पाच सदस्यांचे संख्याबळ कायम ठेवून फोडाफोडीपेक्षा बिनशर्त पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला.
उबाळे यांचा गट अल्पमतात आल्यानंतर अनिल ठवाळ यांच्या गटाशी तडजोड करून पुन्हा बहुमत जुळविले असून माजी पंचायत समिती सदस्या अनुराधा ठवाळ यांना उपसरपंचपदी निवडीचा शब्द दिल्याची चर्चा गावात रंगली आहे.
---
देवराव वाकडे यांना काय मिळणार?
सलग दहा वर्षे पत्नीसह स्वतः सरपंचपद राखणाऱ्या देवराव वाकडे यांना सरपंच निवडीमध्ये चांगलेच ‘मोल’ आले असून ते पद मिळविणार की आगामी कारभार करताना ‘किंमत’ देण्याच्या शब्दावर समाधान मानणार याची ग्रामस्थांमध्ये उत्सुकताआहे.