शिवसेनेने तोडले नगर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:35 AM2021-02-06T04:35:03+5:302021-02-06T04:35:03+5:30

केडगाव : वाहतूक कोंडीमुळे तीन वर्षांपासून बंद असलेले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूचे टाळे शिवसेनेने ...

Shiv Sena breaks locks on Nagar Bazar Samiti entrance | शिवसेनेने तोडले नगर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे टाळे

शिवसेनेने तोडले नगर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे टाळे

केडगाव : वाहतूक कोंडीमुळे तीन वर्षांपासून बंद असलेले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूचे टाळे शिवसेनेने गुरुवारी घोषणाबाजी करत तोडले. रस्ते वाहतूक सुरक्षा समितीच्या आदेशानुसार आम्ही हे टाळे तोडल्याचा दावा शिवसेनेने केला असून बाजार समितीने मात्र गेट उघडण्याबाबत आम्हाला काहीही पत्र आले नसल्याचे सांगितले. नगर शहरातील बाजार समिती चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. नगर बाह्यवळण रस्ता उघडल्यानंतर नगर शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. त्यामुळे नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. रस्ते वाहतूक सुरक्षा समितीचे तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांच्या समितीने नगर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराची एक बाजू बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.

बाह्यवळण रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा ताणही कमी झाला. त्यानंतर शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे बंद प्रवेशद्वार उघडण्याबाबत बाजार समिती व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या रस्ते वाहतूक सुरक्षा समितीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून बंद प्रवेशद्वार उघडण्याबाबत साकडे घातले. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेनेचे विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, मदन आढाव, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, विशाल वालकर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन बंद प्रवेशद्वार उघडण्याबाबत विनंती केली होती.

शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार जिल्हाधिकारी भोसले यांनी बंद प्रवेशद्वार उघडण्याबाबत अनुकूलता दाखवली होती. परंतु, बाजार समितीचे पदाधिकारी गेट उघडण्यास राजी नव्हते, असे सांगितले जाते.

-------

व्यापारी व शेतकऱ्यांना ज्या-ज्या ठिकाणी त्रास असेल तिथे शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील. नगर बाजार समितीतील सत्ताधाऱ्यांनी बंद प्रवेशद्वाराच्या रस्त्याच्या आतील बाजूला गाळे काढून ते विक्री करण्याचा घाट घातला होता. शिवसेनेने गेट उघडून तो मोडून काढला.

-दिलीप सातपुते,

शिवसेना शहर प्रमुख, नगर

---------

बाजार समिती शेतकऱ्यांबरोबर आहे. गेट उघडण्याबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू होता. गेट उघडण्याबाबत प्रशासनाने नगर बाजार समितीला कुठलेही पत्र दिले नाही. शिवसेनेने आंदोलन करत गेट उघडल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

-अभय भिसे,

सचिव, बाजार समिती, नगर

फोटो : ०४ केडगाव आंदोलन

नगर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे टाळे तोडण्यासाठी जमलेले शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते.

Web Title: Shiv Sena breaks locks on Nagar Bazar Samiti entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.