शिवसेनेला ‘अल्टिमेटम’ नाही :रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:56 PM2019-01-05T12:56:10+5:302019-01-05T12:57:46+5:30
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला कोणताही ‘अल्टिमेटम’ दिलेला नाही. ते वृत्त चुकीचे होते़ शिवसेना भाजपशी युती करेल, अशी आशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली़
अहमदनगर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला कोणताही ‘अल्टिमेटम’ दिलेला नाही. ते वृत्त चुकीचे होते़ शिवसेना भाजपशी युती करेल, अशी आशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली़ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली येथे खासदारांच्या बैठकीत शिवसेनेला युतीसाठी महिनाभराची मुदत दिल्याचं वृत्त माध्यमांनी प्रसारित केले होते़ त्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी हे स्पष्टीकरण दिले़
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी शुक्रवारी नगर जिल्ह्यातील बूथनिहाय आढावा घेतला़ त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ दानवे म्हणाले, देशात भाजपाविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येत आहेत़ त्यांनी कितीही तारे तोडले तरी उपयोग होणार नाही़ सर्व विरोधीपक्ष एकत्र आले़ परंतु त्यांनी अद्याप पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही़ पंतप्रधान पदावरून त्यांच्यात भांडणे लागतील़
भाजपाविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी महाआघाडीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ मात्र भाजपाचे संघटन देशात मजबूत आहे़ मजबूत संघटनाच्या बळावर नरेंद्र मोदी
पुन्हा पंतप्रधान होतील, असे दानवे म्हणाले़
भाजपाच्या नेत्यांकडून विभागनिहाय दौरे सुरू आहेत़ कोकण, मराठवाडा, विदर्भातील दौरे पूर्ण झालेले आहेत़ नाशिक विभागाच्या दौऱ्याला नगर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे़ जिल्ह्यातील नगर व शिर्डी मतदारसंघातील बूथनिहाय आढावा घेण्यात येणार असून, अद्याप कुणाचीही उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही़ उमेदवारीसाठी पक्षाची एक प्रक्रिया असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़
पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यावेळी उपस्थित होते़
मोदी पंतप्रधान व्हावेत, ही सेनेचीही इच्छा
राज्यात शिवसेना- भाजपाची युती व्हावी, असे आपले मत आहे़ सध्या आम्ही एकत्र आहोत़ नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी दोन्ही पक्षांची इच्छा असल्याचे दानवे यांनी पत्रकारांना सांगितले़
‘त्या’ राष्ट्रवादीवाल्यांसाठी भाजपची दारे खुली
नगर महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपाने कुणालाही पाठिंबा मागितला नव्हता़ राष्ट्रवादीकडे पाठिंब्याची मागणी केली नाही़ त्यांनीच बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला़ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर पक्षाने कारवाई केल्यास त्यांच्यासाठी भाजपाची दारे उघडी आहेत़ शिवसेनेने आमच्याकडे युती करण्याचा प्रस्ताव दिला नाही़ त्यामुळे युतीवर चर्चेचा प्रश्नच नव्हता़ त्यांनी पाठिंबा मागितला असता तर पक्षाने तो दिला असता आणि महापालिकेत युतीची सत्ता स्थापन झाली असती, असेही दानवे यांनी सांगितले़