पक्षाच्या आमदारांनीच संपवली शिवसेना; 'त्या' नगरसेवकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:23 PM2020-07-10T12:23:20+5:302020-07-10T12:40:01+5:30
औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले. मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत.
अहमदनगर : शिवसेनेच्या जोरावर विजय औटी हे आमदार झाले, विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. मात्र, त्यांनी शिवसैनिकांना कधीच किंमत दिली नाही. सेनेची एकही शाखा त्यांनी उघडू दिली नाही. शिवसैनिकांऐवजी त्यांनी काँग्रेस व कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांना जवळ केले. त्यामुळे त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करा व शिवसेना वाचवा, अशा आशयाचे पत्र पारनेर नगरपंचायतीच्या त्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
पारनेरमधील डॉ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे नाराजी नोंदविताच हे नगरसेवक परत सेनेत आले. मातोश्रीवर या नगरसेवकांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा सेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांना एक पत्र दिले असून त्यात पारनेरचे सेनेचे माजी आमदार औटी यांच्याबद्दल तक्रार केली आहे.
औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले. मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत.
सेनाप्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी साधे दर्शनाला आले नाहीत. आपण मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा साधा फलक लावला नाही. पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांना औटी यांनी तालुक्यात येऊ दिले नाही. आलेच तर शिवसैनिकांशी संपर्क होऊ दिला नाही. त्यांचे सर्व राजकारण हे स्वार्थी होते.
निलेश लंके हे सेनेत असताना पक्षसंघटन वाढवत होते. मात्र, त्यांनाही औटी यांनी त्रास दिला. लंके यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केली असे खोटे चित्र रंगवत त्यांचे तालुकाप्रमुखपद व पक्षातून काढले. मात्र, औटी हेच पक्ष संपवत असून त्यांना शिवसेनेतून काढा अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक राहणार नाही, असा धोका या नगरसेवकांनी पत्रात व्यक्त केला आहे.