शिवसेनेचे खासदार लोखंडे यांच्या श्रीरामपूर येथील बंगल्यात घुसून शिवीगाळ, सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 08:24 PM2021-05-13T20:24:19+5:302021-05-13T20:25:10+5:30

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथील बंगल्यात अनधिकृतपणे प्रवेश करून पढेगाव येथील पाच तरुणांनी राडा घातला. खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास या वेळी शिवीगाळ करण्यात आली.

Shiv Sena MP enters Lokhande's bungalow at Shrirampur and insults him | शिवसेनेचे खासदार लोखंडे यांच्या श्रीरामपूर येथील बंगल्यात घुसून शिवीगाळ, सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

शिवसेनेचे खासदार लोखंडे यांच्या श्रीरामपूर येथील बंगल्यात घुसून शिवीगाळ, सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

श्रीरामपूर : खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथील बंगल्यात अनधिकृतपणे प्रवेश करून पढेगाव येथील पाच तरुणांनी राडा घातला. खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास या वेळी शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी अंगरक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जण घटनेनंतर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपींमध्ये उदय लिप्टेसह चार अन्य अज्ञात तरुणांचा समावेश आहे. या सर्व जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगरक्षक पोलीस हवालदार विनोद उंडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांचे उंबरगाव येथील साई खेमानंद फाउंडेशन येथे वास्तव्य असते. तेथे त्यांचा बंगला आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान उदय शिवाजी लिप्टे व इतर चार तरुण दोन मोटारसायकलवर तेथे आले. बंगल्याचे प्रवेशद्वार उघडून त्यांनी कर्मचारी नीलेश शिंदे यांना जाब विचारला व शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. आत प्रवेश करून तेथील दोन वाहनांचे व्हिडीओ शूटिंग सुरू केले. वाहनांवरील कापड फाडून खासदार लोखंडे याच्या निवासस्थानाकडे प्रवेश केला. या वेळी तरुणांना रोखण्यासाठी सरसावलेल्या अंगरक्षकाला लिप्टे व त्यांच्या साथीदारांनी धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हे तपास करत आहेत. सर्व फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे घायवट यांनी लोकमतला सांगितले.

काय आहे नेमके प्रकरण?

खासदार लोखंडे यांनी लोकसभा निवडणुकीत एलईडी स्क्रीनच्या प्रचारार्थ दोन वाहने वापरली होती. ही वाहने त्यांच्या बंगल्यात उभी आहेत. आरोपी उदय शिवाजी लिप्टे याने कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका म्हणून या वाहनांचा वापर करावा, अशी मागणी करत बुधवारी राडा केला, असे तपासी अधिकारी घायवट म्हणाले.

खासदारांकडे रुग्णवाहिका मागणे गैर नाही. मात्र चुकीची पद्धत वापरल्याने गुन्हा दाखल करावा लागला. आरोपींनी हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून केला याची चौकशी झाली पाहिजे. आरोपींनी निव्वळ प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी.

- राजेंद्र देवकर, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

Web Title: Shiv Sena MP enters Lokhande's bungalow at Shrirampur and insults him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.