भाजपकडून अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेतच : बाळासाहेब थोरात यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 09:30 PM2017-11-02T21:30:48+5:302017-11-02T21:35:57+5:30
जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे.
संगमनेर : शेतकरी क र्जमाफीनंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मोठ्या जाहिरातबाजीनंतर कोणत्याही शेतक-याला कर्जमाफी मिळाली नाही. सत्ताधारी भाजपकडून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची अवहेलना सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कायम जनतेच्या बरोबर राहण्याची भूमिका होती. मात्र, अनेकदा अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेत असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे राज्यील विकासकामे रखडली आहेत. सरकारच्या मागील ३ वर्षांचे कामकाज बघता जनता त्यांच्या क ामकाजावर असमाधानी आहे. कोणतेही ठोस काम या काळात झाले नाही. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतक-यांनी शेतात पिकविलेल्या सोयाबीनची खरेदी सरकारने केली नाही. कांदा व तूर या पिकांबाबत हीच परिस्थिती आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.
सरकारची प्रशासनावर कोणतीही पकड नसल्याने मागील ३ वर्षांत शेतकºयांना कृषी पंपाची वीज बिलेही मिळाली नाहीत. पीक पाण्याचे दिवस आले असता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महानगरांमध्येही भारनियमन होत असून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.
१८२ उमेदवार निवडण्याची जबाबदारी
देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीत आपल्याकडे १८२ उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी असून गुजरातमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपने विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातला पुढे केले, परंतु जीएसटी, नोटाबंदी, घसरलेला आर्थिक दर यामुळे आर्थिक मंदीसह व्यापार व प्रगती मंदावली आहे. भाजपविषयी जनतेत तीव्र नाराजी आहे. काँग्रेसला या निवडणुकीत नक्कीच मोठे यश मिळणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
कन्हैय्या कुमार यांना व्यक्त होण्याचा अधिकार
कन्हैय्या कुमार यांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत विचार मंथन झालेच पाहिजे परंतु भाजपाकडून सर्वत्र मुस्काटबाजी केली जात असल्याची टिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.