सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेने सर्व सर्व तत्वे गुंडाळली; जनताच सेनेला जाब विचारेल, राधाकृष्ण विखे यांची आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:34 PM2020-10-30T12:34:05+5:302020-10-30T12:34:56+5:30
सत्ता टिकविण्यासाठी आज शिवसेनेने आली सर्व तत्वे गुंडाळली आहेत. हिंदुत्वही सोडले आहे. यामुळे राज्यातील जनता सेनेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
अहमदनगर : सत्ता टिकविण्यासाठी आज शिवसेनेने आली सर्व तत्वे गुंडाळली आहेत. हिंदुत्वही सोडले आहे. यामुळे राज्यातील जनता सेनेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पडल्यानंतर ही माझ्या शिवसैनिकांनी पाडली, असे समर्थन केले होते. मात्र आज शिवसेनेचा विचार केला तर त्यांनी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत. राज्यातील जनता हे उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
प्रत्येक धर्माला आपल्या देवाला जायचे स्वातंत्र्य आहे. राज्यात मॉल, जीम, मदिरालय उघडता, पण मंदिर उघडण्यास सरकार परवानगी देत नाही. सरकार एवढे का घाबरत आहे? त्यांना परमेश्वराचा कोप होईल अशी भीती वाटते का? असेही विखे म्हणाले.
शिवसेनेचा स्वबळाचा नारा ही वादळापूवीर्ची शांतता दिसतेय. महाविकास आघाडीत का बेबनाव झाला? तो का वाढत आहे? स्वबळावर लढण्याचा नारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे का देत आहेत? राज्यातील जनतेसाठी नव्हे तर मूठभर लोकांना सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टिकाही विखे यांनी केली.