शिवसेनेकडून भगवान फुलसौंदर लढविणार नगरमधून लोकसभा- भाजपाला शह देण्यासाठी सेना आखतेय रणनिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:46 PM2018-01-04T15:46:26+5:302018-01-04T15:49:01+5:30
भाजप-शिवसेना युतीमुळे आजपर्यंत शिवसेनेला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. सध्या भाजपा व शिवसेनेमधील दुरावा वाढत आहे. भविष्यात युती तुटण्याची शक्यता गृहीत धरुन शिवसेनेकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे.
अहमदनगर : भाजप-शिवसेना युतीमुळे आजपर्यंत शिवसेनेला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. सध्या भाजपा व शिवसेनेमधील दुरावा वाढत आहे. भविष्यात युती तुटण्याची शक्यता गृहीत धरुन शिवसेनेकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर हे नगर दक्षिण मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका खासगी कार्यक्रमात श्रीगोंद्याचे शिवसेनेचे नेते घनश्याम शेलार यांनी फुलसौंदर यांना खासदारकी लढविणार का, असे विचारले होते. त्यानंतर मातोश्रीवरुनही पुढील लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांची चाचपणी करण्याच्या सुचना नगरचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोरगावकर यांनीही फुलसौंदर यांना लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य राहील, अशा शब्दात फुलसौंदर यांनीही खासदारकी लढविण्यास मूक संमती दिली होती, असे सांगण्यात येत आहे़ दरम्यान गुरुवारी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनीही फुलसौंदर हे शिवसेनेचे दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार असतील़ याबाबत लवकरच बैठक घेऊन नाव निश्चित करण्यात येणार आहे, असे सांगितले. शिवसेना भविष्यात भाजपाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची तयारी सुरु असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे.