शिवसेनेचा शेवगावात रास्तारोको : टँकरसह छावण्या सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 06:39 PM2019-03-01T18:39:50+5:302019-03-01T18:40:49+5:30
दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याने शेवगाव तालुक्यात तातडीने पाण्याचे टँकर, गाव तेथे चारा छावण्या सुरू कराव्यात, शेवगाव शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करावी
शेवगाव: दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याने शेवगाव तालुक्यात तातडीने पाण्याचे टँकर, गाव तेथे चारा छावण्या सुरू कराव्यात, शेवगाव शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करावी या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख अॅड. अविनाश मगरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात तब्बल २ तास रास्तारोको करण्यात आला. संघटनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उत्तर जिल्हाप्रमुख रामदास गोल्हार, शहरप्रमुख सुनील जगताप, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष शीतल पुरनाळे, एकनाथ कुसाळकर, भारत लोहकरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
दुष्काळाच्या संकटाने शेवगाव तालुक्यात हिवाळ्यातच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची समस्या बिकट बनली होती. आता उन्हाळाची तीव्रता वाढत असतानाच शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रशासनाच्या पातळीवरून उपाययोजनांची गरज असताना या उपाययोजना संथगतीने सुरू आहे. शेवगाव शहरातील रहदारीच्या प्रमुख चौकात वारंवार वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना अपघातांचा व विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. क्रांती चौकात दोन अपघात होऊन दोन वृद्धांचे बळी गेले आहेत. त्यामुळे बाह्य वळण रस्त्याच्या रेंगाळलेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळवून बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सिद्धार्थ काटे, महेश पुरनाळे, उदय गांगुर्डे, कानिफ कर्डिले, गणेश ढाकणे, महेश मिसाळ, गणेश पोटभरे, किरण मगर, जया जाधव, कोमल पवार, छाया माळी, प्रयागबाई माळी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर, गुप्त वार्ता विभागाचे पोलीस काँस्टेबल राजू चव्हाण यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत संताप
शिवसेनेच्या या आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याप्रसंगी गैरहजर होते. त्यामुळे आंदोलकांनी संबंधित अधिकाºयांच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त केला. तसेच आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर, या अधिकाºयांना पुढील आठवड्यात शिवसेना स्टाईल धडा शिकविला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.