शिवभोजन देणारेच ‘उपाशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:24 PM2020-03-12T12:24:30+5:302020-03-12T12:24:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : गोरगरीब, गरजू लोकांसाठी शासनाने दहा रूपयांत शिवभोजन सुरू केले खरे, मात्र ही योजना सुरू झाल्यापासून शिवभोजन हॉटेलचालकांचे बिलच अदा झालेले नाही. त्यामुळे गरजूंना दहा रूपयांत जेऊ घालणारे हॉटेलचालक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : गोरगरीब, गरजू लोकांसाठी शासनाने दहा रूपयांत शिवभोजन सुरू केले खरे, मात्र ही योजना सुरू झाल्यापासून शिवभोजन हॉटेलचालकांचे बिलच अदा झालेले नाही. त्यामुळे गरजूंना दहा रूपयांत जेऊ घालणारे हॉटेलचालक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उपाशी राहण्याची वेळ आली
आहे.
गरीब, गरजू लोकांसाठी शासनाने २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन योजना लागू केली. या योजनेंतर्गत गरजूंना दुपारी १२ ते २ या वेळेत १० रूपयांत जेवण मिळणार आहे. उर्वरित ४० रूपयांची रक्कम हॉटेलचालकांना शासनाकडून मिळणार आहे. नगर शहरामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते २६ जानेवारीला या योजनेचे धूमधडाक्यात उद्घाटन झाले. योजनेचा प्रतिसाद लक्षात घेता प्रारंभी ७०० थाळ्यांची मर्यादा शासनाने दुपटीने वाढवून १४०० केली. नगरमधील १० केंद्रांवर या थाळीची सोय करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून सर्वच केंद्रांवर उत्तम प्रतिसाद मिळत असून दैनंदिन १४०० थाळ्या शिवभोजन लोकांना विनातक्रार मिळत आहे.
परंतु प्रशासनाकडून या हॉटेलचालकांचे बिलच अद्याप अदा झालेले नाही. दर पंधरा दिवसांनी हॉटेलचालकांची बिले अदा करावीत, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे निधीही वर्ग झाला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हॉटेलचालकांच्या खात्यावर अद्याप बिले वर्ग झाली नसल्याने हॉटेलचालक अडचणीत सापडले आहेत.