शिवालयांमध्ये घुमला ‘हर हर महादेव’ चा गजर
By Admin | Published: August 24, 2016 12:18 AM2016-08-24T00:18:33+5:302016-08-24T00:45:28+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावरील श्री ढोकेश्वराची तिसऱ्या श्रावणी सोमवारी मोठी यात्रा पार पडली.
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावरील श्री ढोकेश्वराची तिसऱ्या श्रावणी सोमवारी मोठी यात्रा पार पडली. ‘हर हर महादेव’ च्या गजराने श्री ढोकेश्वर परिसर दुमदुमून गेला होता.
सोमवारी पहाटे कावडीने आणलेल्या गंगाजलाने महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ढोकीचे सरपंच बाबासाहेब नर्हे, मंदिराचे पुजारी गोसावी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. हजारो शिवभक्तांनी ‘हरहर महादेव’चा गजर केल्याने परिसर भक्तिमय झाला होता. उंच डोंगरावरील या मंदिरात जाण्यासाठी चारशे पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे महिला व वृद्धांची दमछाक होत होती.
टाकळीमधून शिवभक्तांना मंदिराकडे जाण्यासाठी पारनेर आगाराने अचानक बस बंद केल्याने भाविकांचे हाल झाले. शिवभक्तांसाठी २१ क्विंटलचा प्रसाद व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दुुपारी तीन नंतर कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. यावेळी नगर जिल्ह्याबाहेरुनही मल्लांनी हजेरी लावली.
जवळेत गर्दी
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील पुरातन महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. शिवसेवा मंडळाच्यावतीने भाविकांना खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सिध्देश्वर दऱ्यात रीघ
पळवे : पळवेबुद्रुक (ता. पारनेर) येथील सिध्देश्वर येथील सिध्देश्वर दऱ्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी सुमारे पाच हजार भाविकांनी हजेरी लावली. भाविकांच्या गर्दीने शिवलिंग मंदिर परिसर फुलून गेले होते.
सिध्देश्वरला जाताना आदेश्वराचे मंदिर आहे. कधीही न आटणारा झरा येथे आहे. आतापर्यंतच्या दुष्काळात या झऱ्याचे पाणी आटलेले नाही, हे या झऱ्याचे वैशिष्ठ्य आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने गजानन शास्त्री महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे नेते दादा कळमकर यांनी येथे हजेरी लावली.
तांदळाच्या पिंडीचे आकर्षण
सुपा : हंगा (ता. पारनेर) येथे श्रावणी सोमवारी निघणाऱ्या कोरड्या तांदळाच्या पिंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरवर्षी श्रावण महिन्यात गावातील हंगेश्वर मंदिरात भाविक कोरडे तांदूळ देतात. या तांदळापासून पिंडी तयार होतात नंतर या पिंडी एकावर एक ठेवताना मध्ये लिंबू ठेवतात. या पिंडीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
मंदिराचे प्राचीन काम म्हणजे वास्तुकलेचा आदर्श नमुना आहे. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोध्दार केल्याचे मनोहर दळवी यांनी सांगितले.
भाविकांसाठी दर्शनरांग, पार्किंग सुविधा, पाण्याची सुविधा केल्याचे सरपंच तुकाराम नवले यांनी सांगितले. माजी सरपंच कारभारी नग्रे तसेच गावातील तरुणांनी यात्रेचे नियोजन केले होते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.