गडाखांचे शिवबंधन

By सुधीर लंके | Published: August 12, 2020 05:58 PM2020-08-12T17:58:35+5:302020-08-12T18:00:12+5:30

मंत्री शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर जात हातावर शिवबंधन बांधले आहे. गडाख हे अपक्ष आमदार आहेत. असे असताना त्यांना सेनेच्या कोट्यातून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तेव्हाच गडाखांची पावले मातोश्रीच्या दिशेने पडली होती. आता थेट पक्षात प्रवेश करत गडाख आणि शिवसेना या दोघांनीही एकमेकासोबत संसार करण्याचे मान्यच केले आहे.

Shivbandhan of Gadakh | गडाखांचे शिवबंधन

गडाखांचे शिवबंधन

प्रासंगिक

जिल्ह्यात सेनेची तशी वाताहत झालेली आहे. जिल्ह्यात नगर व पारनेर या दोन विधानसभा मतदारसंघात सेनेचे वर्चस्व होते. त्यापैकी नगर मतदारसंघात सेनेला गत दोन निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतरही सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी नगर शहरात पक्ष टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने गत आठवड्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्याचे शिवसेनेचे नेतृत्व आता कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पारनेर मतदारसंघातून विजय औटी हे गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यांच्या विरोधात नगरसेवकांनी नुकतीच बंडखोरी करत पक्षांतर केले होते. तो वाद थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला. औटी हे पूर्वीदेखील मतदारसंघाच्या बाहेर फारसे कधी पडले नाहीत. आता तर आमदारकी गेल्याने त्यांना मर्यादाच आहेत. त्यामुळे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे वगळता सेनेकडे सध्या एकही मोठा चेहरा नव्हता. अशावेळी गडाख यांना थेट सेनेत घेत ही पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केलेला दिसतो. 

गडाख कुटुंब हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहे. यशवंतराव गडाख यांनी दीर्घकाळ शरद पवार यांची साथसंगत केली. नंतर ते राष्ट्रवादीतही गेले. शंकरराव गडाख हे देखील सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या तिकिटावरच आमदार झाले. मात्र, राष्ट्रवादीत आपली कोंडी होत आहे हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. नगर जिल्ह्यात काही बड्या नेत्यांना तशी सेनेनेच संधी दिली. विखे कुटुंबीयांना काँग्रेसने मंत्रिपद दिले नाही. सेनेत गेल्यानंतर मात्र त्यांना लाल दिवा मिळाला. यशवंतराव गडाख यांनाही काँग्रेसने क्षमता असतानाही मंत्रिपद दिले नाही. सेनेने मात्र अपक्ष असताना शंकरराव यांना संधी दिली. 

जिल्ह्यात ‘गडाख’ नावाचे राजकीय अस्तित्व आहे. जिल्ह्यातील नेत्यांवर व स्वपक्षावर टीका करण्याचे धारिष्ट्य हे यशवंतराव गडाख यांनी वेळोवेळी दाखविले. ‘गडाख यांची भूमिका काय आहे?’ याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे सतत लक्ष असते. जिल्हा बँक, जिल्हा परिषद अथवा विधानसभा, लोकसभा यात गडाखांची भूमिका काय राहील याकडे राजकीय नजरा असतात. त्याअर्थाने सेनेला मोठी बळकटी मिळाली आहे. 

जिल्ह्यात भाजपकडे सध्या नेतेच नेते आहेत. राष्ट्रवादीकडे मातब्बर नेते नसले तरी सर्वाधिक तरुण आमदार आहेत. काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने बलवान नेता आहे. सेनेकडे मात्र  खासदार लोखंडे वगळता बलवान चेहरा नव्हता. तो चेहरा गडाख यांच्या रुपाने सेनेने मिळविला. गडाख यांना आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी पक्ष हवाच होता. एका अर्थाने हा पक्षप्रवेश ही सेना व गडाख या दोघांचीही गरज होती. मंत्रिपद मिळाल्यानंतर गडाख हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी गेले तेव्हाच ‘जिल्ह्यात येऊन मला मोठा सोहळा करायचा आहे’, असे ठाकरे त्यांना म्हणाले होते. बहुधा त्यांनी यातून पुढील सूतोवाच केले होते. 

गडाख हे आता थेट ‘सेनेचे मंत्री’ म्हणून ओळखले जातील. त्यांचे मंत्रिपद आता आणखी बळकट होईल. शिवसैनिकांनाही दार ठोठावण्यासाठी एक जागा उपलब्ध झाली आहे. इतर पक्ष आता सेनेला गृहीत धरु शकणार नाहीत. 

यात दोघांचीही एक कसोटी मात्र आहे. दिवंगत बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखे हे सेनेत गेले होते. कोपरगावचे साखर कारखानदार अशोक काळे यांनीही सेनेकडून आमदारकी मिळवली. राहुरीच्या उषाताई तनपुरे यांनीही एकदा सेनेकडून उमेदवारी केली. या प्रस्थापित नेत्यांचे व सेनेचे संबंध फारकाळ टिकले नाहीत. या पार्श्वभूमीवर गडाख आणि सेना एकमेकांशी कसे जुळवून घेणार यावर त्यांचे संबंध कसे राहतील हे ठरेल. तूर्तास तरी सेनेने जिल्ह्यात पक्षबांधणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. गडाखांनीही थेट शिवबंधन बांधत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पवारांनी सेनेसोबत आघाडी केली. गडाखांनी थेट सेनेतच प्रवेश केला. गडाख सेनेत रमले तर त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी आहे. 

Web Title: Shivbandhan of Gadakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.