बहुमतासाठी जोड-तोड करणार नाही : शिवराजसिंग चौहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:44 PM2019-01-01T17:44:59+5:302019-01-01T17:45:13+5:30
मध्यप्रदेश विधानसभेत ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही काहीही करणार नाही़
शिर्डी : मध्यप्रदेश विधानसभेत ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही काहीही करणार नाही़ जनतेशी आमची भावनिक बांधिलकी आहे़ बहुमत काँग्रेसला पण मिळाले नाही़ मते आम्हाला तर जागा त्यांना अधिक मिळाल्या़ मात्र बहुमतासाठी काही जोडतोड करायला आमच्या अंतर्मनाने परवानगी दिली नाही़, असे मत माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी शिर्डीत स्पष्ट केले़
कर्ज माफी देणे योग्यच आहे, पण कर्ज माफी हा यावरील अंतिम उपाय नाही. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवायला हव्यात. अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही नववर्षाची सुरुवात शिर्डीतून करण्यासाठी चौहान यांनी मंगळवारी सहकुटुंब साईदरबारी हजेरी लावली़ दुपारच्या माध्यान्ह आरतीनंतर चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत़ आम्ही खालच्या पातळीवर राजकारण करणार नाही़ त्यांनी चांगले सरकार चालवावे, विकासकामे करावीत़ कारण पाच वर्षे तर माझ्या जनतेचे आहेत ते आम्ही वादात का बरबाद करावेत. त्यांनी काही गडबड केली तर जोरदार विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला़ कर्जमाफीबरोबरच शेतकºयाला त्याच्या उत्पादनाचे योग्य मूल्य द्यायला हवे़ पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खर्चावर पन्नास टक्के लाभ गृहीत धरुन मिनीमम सपोर्ट प्राईज निश्चित केली आहे़ आता ही केवळ घोषणा न राहाता राज्य सरकारांनी त्याची अंमलबजावणी करायला हवी, असे मतही चौहान यांनी व्यक्त केले़
पक्षाने आदेश दिला तर केंद्रात
आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत़ पक्षाने आदेश दिला तर केंद्रात जाऊ. मात्र आपली भावनिक बांधिलकी मध्यप्रदेशच्या साडेसात कोटी जनतेशी आहे़ त्यामुळे त्यांना सोडून जावे वाटत नाही़ त्यांची सेवा आपण करीत राहू असे त्यांनी स्पष्ट केल़े पंतप्रधान मोदी देशाच्या विकासासाठी आशेचा किरण आहेत़ त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू व जनताही त्यांना पुन्हा संधी देईल, असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला़