शिवसैनिक हत्या प्रकरण : भाजपा आमदार शिवाजी कर्डिले अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 09:01 AM2018-04-09T09:01:25+5:302018-04-09T10:32:46+5:30
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणी भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणी भाजपा आमदारशिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी अटक केली आहे. भिंगार पोलिसांनी सोमवारी (9 एप्रिल) सकाळी ही कारवाई केली आहे. कर्डिले यांच्यावर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणीही गुन्हा दाखल आहे. शनिवारी (7 एप्रिल) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील सुवर्णनगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली.
दरम्यान, यापूर्वी या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. तर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 22 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
कोणाकोणाचा आहे समावेश?
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर यांच्या सांगण्यावरुन विशाल कोतकर, औदूंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, रवी खोलम, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिर्हे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गंगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे यांच्यासह पाच ते सहा जणांनी कट, कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता तलवारीने मारल्याचे या फिर्यादीत म्हटले गेले आहे.