केडगाव हत्या प्रकरण: अहमदनगरचे शिवसैनिक अटकेसाठी 'वर्षा'वर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:19 PM2018-04-15T13:19:41+5:302018-04-15T15:27:10+5:30
दोन शिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिक आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होवू न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली. तरीही पोलीसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले.
अहमदनगर : शिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिक आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होवू न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली. तरीही पोलीसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे गुन्हे दाखल झालेले सर्व सहाशे शिवसैनिक मंगळवारी (दि.१७) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी स्वत:ला अटक करवून घेणार आहेत.
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिका-यांनी आज सकाळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यांना केडगाव हत्याकांडानंतरची परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व शिवसैनिक मंगळवारी वर्षा बंगल्यावर जावून अटक करवून घेतील, असा आदेश ठाकरे यांनी दिला. यावेळी खुद्द ठाकरे हेही वर्षा बंगल्यावर उपस्थित राहणार आहेत. केडगाव येथे ७ एप्रिलला संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाली. या हत्येनंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको, दगडफेक, पोलीस कर्मचारी, अधिका-यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिका-यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दशक्रिया विधीला सेनेचे दोन मंत्री
सोमवारी (दि. १६) केडगाव येथील शांतीवनात होणार आहे. यावेळी शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सर्व शिवसैनिक मुंबईकडे रवाना होतील. त्यानंतर मंगळवारी सकाळी वर्षा बंगल्यावर शिवसैनिक अटक करवून घेतील. जिल्ह्यातील पदाधिका-यांनी शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपही पदाधिका-यांनी केला.
ठाकरे २५ रोजी नगरमध्ये
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २५ एप्रिल रोजी नगरमध्ये येणार आहे. ते कोतकर व ठुबे या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.