शिर्डीकरांना थकबाकी वसुलीसाठी ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:36+5:302021-03-19T04:19:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : आर्थिक अडचणीत असलेल्या साईनगरीतील वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने कनेक्शन कटच्या माध्यमातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : आर्थिक अडचणीत असलेल्या साईनगरीतील वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने कनेक्शन कटच्या माध्यमातून शॉक ट्रीटमेंट सुरू केली आहे. नऊ हजार ग्राहकांपैकी जवळपास साडेपाचशेहून अधिक ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे.
नोव्हेंबरमध्ये मंदिर उघडल्यानंतर डिसेंबर-जानेवारीत थोडीफार आवक सुरू झाल्याने व्यवसायिकांनी प्राधान्याने जमेल तेवढे वीज बिल भरले. आता भाविकांचा ओघ थांबल्याने व्यवसाय ठप्प आहेत. खासगीकरणाची सुरू झालेली चर्चा व थकबाकीमुळे वसुलीसाठी वरिष्ठांकडून असलेला रेटा यांमुळे वीज वितरणचे कर्मचारी पुन्हा दारात येऊन बसले आहेत. याप्रसंगी वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. त्यातच नगरपंचायत व बँकांचाही वसुलीसाठी तगादा सुरू असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद होते. तरीही सरासरी बिलामुळे भरमसाट बिले आली. वीजजोडणी तोडली तरी मागणी आकार माफ होत नाही. काही मोठी हॉटेल्स महिन्याला पन्नास हजारांपर्यंत मागणी आकार भरतात.
....
प्रत्यक्ष वापराऐवजी सरासरी बिले देण्यात येतात. नादुरुस्त मीटरही बदलण्यात येत नाहीत. त्यातच ग्राहकांअभावी हॉटेल ओस पडलेली आहेत. त्यामुळे बिल कसे भरावे? असा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या किंवा वीजवापर बंद असतानाच्या काळातील मागणी आकार माफ करणे गरजेचे आहे. आजवर जिल्ह्यात सर्वाधिक महसूल भरणाऱ्या शिर्डीला अडचणीच्या काळात वीज कंपनीकडून सहकार्य अपेक्षित आहे.
- नीलेश कोते, हॉटेल व्यावसायिक
...
शिर्डीत अडीच कोटींची मागणी असून चार कोटी थकबाकी आहे. नऊ हजार ग्राहकांपैकी जवळपास साडेपाचशे थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली आहे. लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांच्या मागणी आकाराची वसुली बँकाप्रमाणे स्थगित होती. नंतरच्या बिलात स्थगित काळातील मागणी आकार समाविष्ट करण्यात आला.
- दुर्गेश जगताप, साहाय्यक अभियंता, वीज वितरण कंपनी, शिर्डी.