धक्कादायक! गाडीखाली चिरडून शेतकऱ्याचा खून
By सचिन धर्मापुरीकर | Published: October 18, 2024 08:27 PM2024-10-18T20:27:58+5:302024-10-18T20:28:23+5:30
पोलिसांत तक्रार करण्यासाठी जातो म्हणून आरोपीला आला राग.
सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव (अहिल्यानगर) : शिविगाळ केल्याची पोलिसांत तक्रार देण्यासाठी मुलासह निघालेल्या शेतकऱ्याला कारखाली चिरडून खून केल्याची घटना, गुरूवारी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात घडली. याप्रकरणी रात्री दोन वाजता कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब पुंजाबा गागरे (वय ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
गुरूवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून शेतीचे कामे आटोपून रावसाहेब गागरे, त्यांचा मुलगा प्रवीण व प्रशांत गागरे हे ट्रॅक्टरमधून घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात अमोल बळीराम शिंदे (रा. धोत्रे, तालुका कोपरगाव) हा त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर दारू पीत बसला होता. त्यावेळी त्यांना प्रवीण गागरे म्हणाला, आमचा ट्रॅक्टर जाऊ द्या. त्याचा राग अमोल शिंदे याला आला. गागरे पिता-पूत्र तेथून निघून घरी गेले. त्यानंतर अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांना फोन करून शिवीगाळ केली.
शिवीगाळ केल्यानंतर अमोल शिंदेविरूद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी रावसाहेब गागरे व प्रवीण आणि त्याचा भाऊ प्रशांत रात्री आठच्या सुमारास मोटारसायकलवरून कोपरगावकडे निघाले. तेव्हा धोत्रे ते खोपडी रस्त्यावर अमोल बळीराम शिंदे याने एमएच १७ सीएच ९९१९ क्रमांकाच्या कारने गागरे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडकेमुळे तिघेही खाली पडले. तेव्हा अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांचे अंगावरून दोन-तीन वेळेस कार मागेपुढे करून रावसाहेब गागरे यांचा खून केला. यात प्रवीण व प्रशांत हे सुद्धा जखमी झाले. घटनेनंतर अमोल शिंदे पळून गेला.
वरील आशयाची फिर्याद प्रवीण रावसाहेब गागरे (वय ३२) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अमोल शिंदे याचे विरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३५२, ३५१ (२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अमोल घाटी रूग्णालयात
गुरूवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अमोल शिंदे याचा शोध घेण्यासाठी तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, तेव्हा आरोपी अमोल शिंदे हा वैजापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक संदीप कोळी व पोलिस पथक वैजापूरला गेले. यावेळी अमोल शिंदे याच्याही डोक्यास मार लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. घाटी रूग्णालयात योग्य पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला असून डिस्चार्ज मिळताच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.