शूरा आम्ही वंदिले : संतोष अमर जाहला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 03:59 PM2018-08-16T15:59:10+5:302018-08-16T16:03:24+5:30
भारतीय जवान रात्रं-दिवस डोळ्यात तेल घालून भारतीय सीमेचे व मेंढारमधील जनतेचे संरक्षण करत होते. भारतीय जवानांनी कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातले.
भारतीय जवान रात्रं-दिवस डोळ्यात तेल घालून भारतीय सीमेचे व मेंढारमधील जनतेचे संरक्षण करत होते. भारतीय जवानांनी कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. तर काही भारतीय जवानही जखमी झाले. नेहमी हसरा चेहरा असणारे संतोष रागाने लालबुंद झाले होते. प्रत्येक क्षणाक्षणाला ते आपला बंदुकीचा चाप ओढत होते. अतिरेक्यांना जिवे मारण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत होते. गरजेनुसार आपली पोझिशनही बदलत होते. १७ आॅगस्ट २००१ रोजी दुपारच्या सुमारास ते ज्या ठिकाणी तैनात होते, तेथे त्यांच्या दोन्ही बाजूस अतिरेक्यांनी गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. संतोष एकाच दिशेने फायरिंग करत होते. आजूबाजूला सोबतीला कुणीच नव्हते. हा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता.
र्भगिरीच्या डोंगरकुशीत वसलेले, हिरवाईने नटलेले, पावसाळ्यात डोळ्याचे पारणे फेडणारे, डोंगरदऱ्यातील निसर्गरम्य गाव देवगाव, ता नगर. येथेच तुकाराम वामन व दगडाबाई या दाम्पत्याच्या पोटी २१ डिसेंबर १९७१ रोजी एका वीर योद्ध्याने जन्म घेतला. त्याचे नाव संतोष.
वडील तुकाराम यांचा पारंपरिक व्यवसाय शेतीचा होता. पुरेसा पाऊस नसल्याने हा भाग तसा दुष्काळाचा. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही वणवण. त्यामुळे वडिलांनी शेती व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड दिली. मिळणाºया उत्पन्नातून घरखर्च भागला जाईल व थोडीफार मिळकत मागे राहील या उद्देशाने वडील रात्रंदिवस कष्ट करत. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण बहिणीकडे झाले. माध्यमिक शिक्षण पेमराज सारडा व नंतर बुºहाणनगर येथील बाणेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. संतोष बारावी पास झाल्यानंतर घरच्या परिस्थितीविषयी त्यांना मोठी चिंता वाटू लागली. त्यासाठी नोकरीची नितांत गरज त्यांच्या लक्षात आली. हसरा चेहरा, लहानपणापासून व्यायाम, घरच्या दुधाचा सकस आहार यामुळे संतोष शरीराने भारदस्त व रुबाबदार होते. शरीराला शोभणारी लष्करी खात्यातील नोकरीच योग्य असल्याचे संतोषच्या गुरुजींनी सांगितले होते. म्हणून संतोष यांनी लष्करात भरती होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
संतोष यांच्या कठोर प्रयत्नांना अखेर २० आॅक्टोबर १९९८ रोजी यश आले. वयाच्या १९ व्या वर्षी ते मराठा लाईट इन्फंन्ट्रीमध्ये भरती झाले. या बातमीने आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपला मुलगा भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर जाणार याचा मोठा अभिमान त्यांना वाटला.
भरतीनंतर त्यांना बेळगाव येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी जावे लागले. नऊ महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते काही दिवसांसाठी सुटीवर आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना पहिली पोस्टींग जम्मू काश्मीरमधील पूंछ, राजौरी या भागात देण्यात आली. हा भाग भारत-पाकिस्तान सीमेपासून ५० किलोमीटर आहे. या जिल्ह्याच्या चारही बाजूंनी उंच उंच डोंगररांगा आहेत. यात अतिदुर्गम भागात लोकसंख्येचे प्रमाणही फारच कमी आहे. जोरात वाहणारी बोचरी थंडी, दºयाखोºयात वाढलेले सरकांडी नावाचे गवत. या गवतात लपून अतिरेकी भारतीय जवानांवर अचानक हल्ला करतात. संतोष यांनी तेथील भौगोलिक परिस्थितीचा चांगलाच अभ्यास केला होता. शत्रूचे येणारे संभाव्य मार्ग, चोर वाटा, उंचावरील ताब्यात घेतलेली महत्वाची ठाणी, ज्या ठिकाणावरून सहजपणे शत्रूवर हल्ला करता येऊ शकतो या सर्वाचा अभ्यास संतोष यांनी केला होता.
जून-जुलै महिन्यात सुट्टीवर आल्यानंतर संतोष लष्करातील अनेक किस्से, लढायांची माहिती मित्रांना ऐकवत.
सुटी संपल्यानंतर ८ आॅगस्ट २००१ साली पुन्हा ते मातृभूमीच्या सेवेसाठी रवाना झाले. पूंछ-राजौरीवरून काही दिवसान्ांी त्यांची नेमणूक मेंढार या गावी तेथील लोकांच्या रक्षणासाठी झाली. मेंढार गाव निसर्गसौंदर्याने नटलेलं. पांढºयाशुभ्र बर्फाने जणू चादर ओढलेली. नेहमीच थंड हवा, उणे अंश सेल्सियम तापमान, डोंगरदºयात वाहणारे खळखळ पाणी, लांबच लांब दिसणारे घनदाट जंगल या सर्व गोष्टींमुळे तेथे नेहमीच आतंकवाद्यांचे वास्तव्य असायचे. गावात सतत चालू असणारा गोळीबार, महिलांची लूट, निष्पाप लोकांचा बळी या सर्व त्रासामुळे येथील ग्रामस्थांना रोजच मरण समोर दिसत होते. अशा गावात भारतीय लष्कराची छत्रपती शिवाजी महाराज तुकडी रवाना करण्यात आली. आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरात संतोष व त्यांची ही टीम शत्रूला धडा शिकवण्यासाठी मेंढार येथे आली होती. १५ आॅगस्ट म्हणजे आत्मबलिदान केलेल्या शूर जवानांच्या महान पराक्रमाला उजाळा दिला जात असतानाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी केली. मेंढार गावात आतंकवादी घुसले होते.
त्यांनी निरपराध लोकांवर गोळीबार सुरू केला. त्यात कित्येक निष्पाप लोक मारले गेले. स्वातंत्र्यदिनी रक्ताचा पाट गावातून वाहू लागला.
लष्कराला या हल्ल्याची माहिती मिळताच तुकडीने पोझिशन घेतली. संतोष सर्वांत पुढे होते. रागाने चेहरा तापला. बंदूक अधिक घट्ट झाली. डोळ्यामध्ये लाव्हारस उफळत लाल झाला. हेच ते आॅपरेशन रक्षक होते. सर्व जवानांनी अतिरेक्यांना उत्तर देण्यास सुरूवात केली. पण या झटापटीत काही अतिरेकी पळून गेले, तर काही भारतीय सैनिकांच्या निशाण्यावर सापडले. तेथील भाग हा डोंगराळ व दºयाखोºयाचा असल्याने अतिरेक्यांना लपण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होती. ज्या दिशेने गोळीबार होईल, त्या दिशेने भारतीय जवान प्रतिहल्ला करत होते. हे छुपे युद्ध दोन दिवस चालू होते. यासाठी भारतीय जवान रात्रं-दिवस डोळ्यात तेल घालून भारतीय सीमेचे व मेंढारमधील जनतेचे संरक्षण करत होते. भारतीय जवानांनी कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. तर काही भारतीय जवानही जखमी झाले. नेहमी हसरा चेहरा असणारे संतोष रागाने लालबुंद झाले होते. प्रत्येक क्षणाक्षणाला ते आपला बंदुकीचा चाप ओढत होते. अतिरेक्यांना जिवे मारण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत होते. गरजेनुसार आपली पोझिशनही बदलत होते. १७ आॅगस्ट २००१ रोजी दुपारच्या सुमारास ते ज्या ठिकाणी तैनात होते, तेथे त्यांच्या दोन्ही बाजूस अतिरेक्यांनी गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. संतोष एकाच दिशेने फायरिंग करू शकत होते. आजूबाजूला सोबतीला कुणीच नव्हते. नियतीने संतोष यांना खिंडीत गाठले. अतिरेक्यांनी चोहोबाजूंनी वेढले गेलेल्या संतोष यांच्या शरीराची शत्रूच्या गोळ्यांनी चाळण झाली. शरीरात प्राण आहे तो पर्यंत अतिरेक्यांशी लढत होता. आपल्या देशवासियांना वाचवण्यासाठी लढता लढता त्यांना अखेर वीरगती प्राप्त झाली. ‘भारत माता की जय’ म्हणत त्यांनी आपला देह भारत मातेच्या कुशीत ठेवला. २ वर्ष १० महिन्यांच्या सेवेमध्येच संतोष शहीद झाले. देवगावमध्ये ही बातमी येऊन धडकली तशी गावातील मंडळी जमा होऊ लागली. प्रत्येकाच्या तोंडातून संतोषच्या नावाचा जयघोष चालू होता. जो तो हळहळ व्यक्त करत होता. ही बातमी जेव्हा माता-पित्यांना कळाली तेव्हा त्यांच्या आक्रोशाने साºया गावात अश्रूचा महापूर लोटला. २० आॅगस्ट रोजी वीरगती प्राप्त झालेल्या संतोष यांना तिरंग्यात लपेटून देवगावमध्ये आणले. नंतर नगरच्या एमआयआरसीमध्ये श्रध्दांजली वाहण्यात आली. गावात आलेला पार्थिव देह पाहून हजारोंची मने हेलावली़ सजवलेल्या वाहनातून संतोष यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गाव परिसरातील शेकडो नागरिक संतोषला अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झाले होते. लष्कराने त्यांना लष्करी इतमामात शेवटची सलामी दिली.
गावात स्मारक
शहीद संतोष वामन यांनी केलेल्या महान पराक्रमाची आठवण राहावी तसेच येणाºया भावी पिढीने देशभक्तीची सेवा अविरतपणे पुढे न्यावी, यासाठी संतोष हे आदर्श बनले. आजही या आठवणींना उजाळा देण्यासाठी संतोष यांचा अर्धाकृती पुतळा असलेले भव्य स्मारक देवगावमध्ये आहे. त्यांच्या स्मरणार्थ जवळच वाचनालयाची इमारत बांधली आहे. इमारतीचे नावही संतोष वामन वाचनालय असे ठेवण्यात आले. संतोष यांच्या प्रत्येक पुण्यस्मरणाला १७ आॅगस्ट या दिवशी गावामध्ये शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद केला जातो.
कुस्तीचे धडे संतोष जेव्हा सुट्टीत गावी यायचे तेव्हा गावातील तरूणांना कुस्तीचे धडे देत असत. मैदानी खेळाची त्यांना खूप आवड होती. सुट्टीवर आले की ते गावातील लहान-मोठ्या मुलांना जमा करून त्यांना मैदानी खेळासाठी तरबेज करत. आपल्याप्रमाणे गावातील तरुण लष्करात यावे म्हणून ते मुलांच्या भरतीसाठी प्रोत्साहन देत असत.
शब्दांकन : नागेश सोनवणे