शूरा आम्ही वंदिले : चासचा जिगरबाज, रंगनाथ आमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:24 PM2018-08-22T14:24:41+5:302018-08-22T14:27:02+5:30
नगर तालुक्यातील चास गाव. नगरहून पुण्याकडे जाताना लागणारे हे पहिलेच गाव असल्याने जवळपास सर्वांच्याच परिचयाचे आहे. गावात नृसिंहाचे पुरातन देखणे मंदिर आहे. गावातून पुण्याकडे जाताना रस्त्याच्या कडेलाच एक स्मृतिस्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेतो़ हा स्मृतिस्तंभ १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात रंगनाथ रामा आमले यांनी गाजविलेल्या शौर्याची साक्ष देत आहे.
नगर तालुक्यातील चास गाव. नगरहून पुण्याकडे जाताना लागणारे हे पहिलेच गाव असल्याने जवळपास सर्वांच्याच परिचयाचे आहे. गावात नृसिंहाचे पुरातन देखणे मंदिर आहे. गावातून पुण्याकडे जाताना रस्त्याच्या कडेलाच एक स्मृतिस्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेतो़ हा स्मृतिस्तंभ १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात रंगनाथ रामा आमले यांनी गाजविलेल्या शौर्याची साक्ष देत आहे.
चासमधील रामा बाळा आमले आणि जिजाबाई या दाम्पत्याला एकूण आठ अपत्ये. त्यातील पहिल्या चार मुली. नंतरची चार मुले. यात सर्वात लहान रंगनाथ. घरात सर्वात लहान असल्याने ते बहिणी आणि भावांचे लाडके. सर्वच त्यांच्याशी लाडाने वागायचे. रामा आमले यांची वडिलोपार्जित थोडी शेती होती़ पण त्यात कुटुंबाचे भागत नसे़ घरातील मोठी भावंडे वडिलांना त्यांच्या शेतीकामात मदत करत. रंगनाथ यांचा जन्म १० जानेवारी १९४९ मध्ये झाला. कधी दुष्काळ तर कधी नैसर्गिक आपत्ती ठरलेली असायची. यामुळे शेतीतून सर्वच कुटुंबाचे कसेबसे भागवावे लागे. रंगनाथ यांचे सातवीपर्यंत शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यांना पुढील शिक्षणाची ओढ लागली होती. गावात पुढील शिक्षणाची सोय नव्हती. पण घरात सर्वात हट्टी म्हणून त्यांना पुढील शिक्षणासाठी नगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये टाकण्यात आले. तेथे १० वी पर्यंत शिक्षण झाले़ दहावीत असतानाच त्यांना लष्करात भरती होण्याचे वेध लागले़ पण घरच्यांना सांगावे तर ते विरोध करतील म्हणून काय करावे, हा मोठा प्रश्न रंगनाथ यांच्यासमोर उभा राहिला. लष्करात जाण्याची आवड आणि त्यास घरच्यांचा होणार असलेला विरोध या द्विधा अवस्थेत ते सापडले. बरेच दिवस यावर मार्ग निघत नव्हता. शेवटी नगरला होणाऱ्या लष्करी भरतीसाठी ते कोणालाही न सांगता गेले. पिळदार शरीरयष्टीमुळे ते मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करात भरती झाले. त्यांचे स्वप्न तर पूर्ण झाले. १० जानेवारी १९६६ ला ते भारतीय लष्करात दाखल झाले. योगायोग असा की ज्या दिवशी ते भरती झाले त्या दिवशी त्यांचा जन्मदिवस होता. नोकर भरतीचा आणि जन्म दिवस एकच असा दुर्मिळ योग रंगनाथ यांच्या जीवनात आला. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ते भारतीय लष्कराचा एक भाग झाले होते. पण घरात आई, वडील, भाऊ, बहीण यांना याची काहीच कल्पना नव्हती. घरी ही गोड बातमी कशी सांगायची, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता.
शेवटी धाडस करून त्यांनी आपण लष्करात भरती झाल्याचे सांगितले. घरच्यांना पहिल्यांदा हा धक्काच होता. पण हा तर भरती होऊन आला़ आता विरोध करून काय उपयोग म्हणून घरच्या लोकांचा नाईलाज झाला आणि ते रंगनाथ यांच्या निर्णयाचे कौतुक करू लागले. त्यांची पहिली ट्रेनिंग बेळगाव येथे झाली. तेथे त्यांनी युद्धासाठी आवश्यक सर्व ट्रेनिंग घेतले. सराव केला. त्यांना बॉक्सिंग खेळाची आवड होती. लष्करात असले तरी ते आपला खेळ खेळत होते. लष्करातील एका स्पर्धेत त्यांनी एका शीख खेळाडूला पराजित केले. त्यानंतर ते सुट्टीवर आले. सुट्टीत आले की आपल्या विवाहित बहिणींच्या घरी जाण्याचा त्यांचा नेहमीचा बेत असायचा. असेच एकदा सुट्टीवर असताना त्यांचे वाढते वय पाहून घरच्यांनी त्यांच्यासाठी मुलगी पाहण्याची तयारी सुरु केली. रंगनाथही लग्न करण्यास तयार होते.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मुलगी पाहण्याची तयारी करत असतानाच त्यांना तातडीची तार आली. ती लष्करातून आली होती. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची ठिणगी पडली होती. रंगनाथ यांना तातडीने ड्युटीवर हजर होण्याचे आदेश मिळाले. भारतमातेच्या सेवेसाठी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आसाममधील जैसुर भागात कार्यरत झाले. त्यावेळी बांगलादेश पाकिस्तानच्या ताब्यात होता. पाकिस्तानने एकाच वेळी भारताच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंनी हल्ला केला. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ या काळात हे युद्ध झाले. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरु होते. हवाईतळांवर हल्ले होत होते. शत्रूंचे बंकर उडवले जात होते. तेव्हा रंगनाथ जैसुर (आसाम) भागात पाकिस्तानी सैन्याशी लढत होते. त्यांची कामगिरी जोरात सुरु होती. भारतीय सैन्याने दाखवलेल्या पराक्रमामुळे पाक सैन्याने युद्धात शरणागती पत्करली. युद्ध संपल्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी रंगनाथ आपल्या जैसुर येथील बंकरमध्ये सीमांचे रक्षण करत होते. युद्ध संपल्याने ते बेसावध झाले. मात्र पाकिस्तानच्या छुप्या सैन्याने पाठीत खंजीर खुपसावा तसा त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात रंगनाथ यांच्या शरीराची चाळण झाली. युद्धात पाकिस्तानच्या विरोधात शौर्य गाजवलेल्या एका शूर वीरावर बेसावध हल्ला झाला होता. त्यात ते जागीच शहीद झाले. तो दिवस होता १४ डिसेंबर १९७१.
रंगनाथ शहीद झाल्याची दु:खद वार्ता त्यांच्या मूळ गावी म्हणजे चास येथे चार दिवसांनी तार आल्याने समजली. लष्कराच्या ताब्यात असलेल्या त्यांच्या पार्थिवावर तिकडेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तेव्हा आजच्यासारखी सुविधा नव्हती. यामुळे रंगनाथ यांचे अंतिम दर्शन घेण्याचे भाग्यही त्यांचे आई, वडील तसेच भावंडांना मिळाले नाही. रंगनाथ शहीद झाल्याची वार्ता समजताच गावात शोककळा पसरली. सर्वजण त्यांची आठवण काढत रडू लागले. आई, वडील यांना तर मोठा मानसिक धक्काच बसला होता. मोठे बंधू बाळू आमले, राजाराम आमले, विठ्ठल आमले, पुतणे जयसिंग आमले यांना रंगनाथ यांचे अंतिम दर्शन न झाल्याची खंत कायम आहे.
शहीद रंगनाथ यांचे नगर-पुणे मार्गालगत उंच स्मारक उभारण्यात आले आहे. गावात येता जाता ते सहज नजरेस पडते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या घरातील लोक विविध उपक्रम व त्यांच्या नावाने स्पर्धा भरवत असतात. यातून गावातील मुलांना त्यांच्यापासून देशसेवेची सतत प्रेरणा मिळत आहे.
स्मारकासमोरच वडिलांचे निधन
शहीद रंगनाथ यांचे वडील रामा आमले यांना रंगनाथ शहीद झाल्याचा मोठा धक्का बसला. ते मानसिकदृष्ट्या या धक्क्यातून स्वत:ला सावरू शकले नाहीत. त्यांच्यात नैराश्य आले. ते रोज आपल्या शहीद मुलाच्या स्मारकाजवळ येऊन बसत. त्याच्या आठवणीत बुडून जात़ असेच एकदा ते स्मारकाशेजारी बसले असताना त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
- शब्दांकन : योगेश गुंड