शूरा आम्ही वंदिले : देशासाठी जीवाची बाजी, शंकर एरंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:54 PM2018-08-22T13:54:26+5:302018-08-22T13:57:03+5:30
१९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानच्या युध्दात दोन्ही बाजूंच्या सैनिकात धुमश्चक्री सुरू होती. वडझिरे येथील जवान शंकर एरंडेसह त्याचे सहकारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत होते.
१९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानच्या युध्दात दोन्ही बाजूंच्या सैनिकात धुमश्चक्री सुरू होती. वडझिरे येथील जवान शंकर एरंडेसह त्याचे सहकारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत होते. दोन्ही बाजूंकडून बॉम्बहल्ले, गोळीबाराच्या फैरी झडत होत्या. पायदळाच्या या तुकडीने पाकिस्तानी सैनिकांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या काही मूठभर सैनिकांनी या तुकडीला घेरून त्यांच्यावर बॉम्बहल्ला व गोळीबार केला. यात शंकरसह त्याचे सहकारी देखील शहीद झाले. परंतु या तुकडीच्या साहसी आणि धाडसीपणाने तमाम भारतीयांनी त्यावेळी सलाम केला.
वडझिरे येथील शेतकरी बाबू एरंडे यांचे एकत्रित कुटुंब. त्यामुळे कुटुंबाचा आवाका मोठा होता. त्यांना शंकर यांच्यासह सहा मुले होती़ शंकर यांचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले़ त्यानंतर गावात शिक्षणाची सोय नसल्याने जामगाव येथील माध्यमिक विद्यालयात शंकरला पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षणासाठी पाठविण्यात आले़ आठवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी शंकरला आपल्या शेतात काम करण्यास सांगितले. शंकर शेतात काम करु लागला. कधी कधी गुरे वळण्याचे कामही तो करी. केवळ गुरे, ढोरे सांभाळण्यापेक्षा आपण काहीतरी काम केले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात येत होता. त्यामुळे गावात दुष्काळी पट्ट्यात सुरू असणाऱ्या रोजगार हमीच्या कामावर तो जाऊ लागला. आपले कुटुंब मोठे असल्याने आपण केवळ रोजगार हमी किंवा शेतात काम करून भागणार नाही, असे शंकरला वाटे़ त्याच काळात देशभरात भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या रेडिओवरून ऐकल्या जात होत्या़ देशासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन युवकांना करण्यात येत होते़ शंकर यांनी देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १९५८ मध्ये थेट पुणे गाठले़ तेथे त्यांच्या शरीराचा धडधाकटपणा पाहून लगेच भरती करून घेण्यात आले़ शंकर लष्करात भरती होऊन गावात आल्यानंतर गावातील तरूणांनी त्यांची मिरवणूक काढली. कारण लष्करात भरती होणारे शंकर हे गावातील पहिलेच तरूण होते असे त्यांच्याबरोबरील लोक सांगतात. यानंतर ते बेळगाव येथे लष्करी प्रशिक्षणासाठी गेले़ एक-दोन वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर वडिलांनी शंकर यांचा विवाह गावातील मोरे कुटुंबातील चांगुणाबाई यांच्याबरोबर थाटामाटात लावला.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक, अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या होत्या़ भारतात घुसखोरी करून काश्मीरवर हक्क सांगण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत होते़ यामुळे भारतीय जवानांच्या मोठ्या तुकड्या भारतीय सीमेवर १९६२ पासूनच वाढविण्यात आल्या होत्या़ तीन वर्षे शंकर व अनेक लष्करी जवानांना याच भागात देशाच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते़ यावेळी अनेकवेळा भारत व पाकिस्तान यांच्यातील सैन्यात चकमकी होत होत्या़ भारताने त्यावेळी चोख प्रत्युत्तर देऊनही पाकिस्तानची घुसखोरी सुरूच होती़ शेवटी भारताने पाकिस्तानच्या घुसखोºया थांबत नसल्याने व भारतीय हद्दीत घुसणारे पाकिस्तानी सैन्यांना व अतिरेक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानबरोबर युध्दाची घोषणा केली़ विमाने, हेलिकॉप्टरने एकीकडे पाकिस्तानी सैन्यावर बॉम्बहल्ले व गोळीबार सुरू करण्यात आला़ दोन्ही बाजूंकडून बॉम्ब हल्ले व गोळीबाराचा थरार सुरू होता़ वायुदलाचे सैनिक हवेतून लढा देत असताना शंकर एरंडे यांच्यासह पायदळाचे सैन्य पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत होते़ अनेक दिवस युध्द सुरू असताना १५ सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानी सैन्याला हरवून पुढे चालणाºया भारतीय लष्कराच्या तुकडीला मूठभर असलेल्या पाक सैनिकांनी लक्ष्य करीत हल्ले व गोळीबार सुरू केला़ भारतीय सैनिकांनी सडेतोड प्रत्युतर दिले. परंतु या तुकडीला यश आले नाही. यात शंकर एरंडे यांच्यासह अनेक भारतीय सैनिक शहीद झाले़ शंकर एरंडे यांच्या शहीद होण्याची तार वडझिरे गावात चार-पाच दिवसांनी आली़ त्यावेळी काय झाले हे आजही आम्हाला सांगता येत नाही, असे शंकर यांची पत्नी चांगुणाबाई सांगत होत्या़ आपले मालक देशसेवा करताना शहीद झाले, पण देशातील असंख्य लोकांचे संरक्षण केले, असे चांगुणबाई सांगत होत्या़
गावाला आठवणींचा विसर
भारत-पाकिस्तानच्या युध्दात आपली प्राणाची आहुती देणारे शंकर बाबू एरंडे यांच्या देशभक्तीचा वडझिरे ग्रामस्थांना विसर पडला आहे़ गावात शहीद जवान एरंडे यांचे कोणतेही स्मारक नाही़ शिवाय गावात त्यांच्या शहीद दिनी कोणतेही कार्यक्रम होत नाहीत़ शहीद जवान शंकर यांची पत्नी चांगुणाबाई या वयोवृध्द आहेत़ त्या मामा मोरे कुटुंबीयांकडे तर कधी पुतणे विजय एरंडे यांच्याकडे राहतात़ पंचवीस हजार रूपये त्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालतो़ गावात स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश आले नाही, असे त्यांचे पुतणे विजय एरंडे यांनी सांगितले़
- शब्दांकन : विनोद गोळे