शूरा आम्ही वंदिले : हिमानी पहाडीतील वीर योद्धा, सुखदेव ढवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:48 PM2018-08-14T13:48:44+5:302018-08-14T13:51:31+5:30
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात ३१ मार्च १९८७ रोजी सुखदेव यांना वीरमरण आले, भारतमातेच्या कुशीत आणखी एक वीर योद्धा विसावला.
आपल्याला क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव दिले आहे तर त्यांच्यासारखेच व्हायचे असा निर्धार श्रीगोंदा तालुक्यातील उख्खलगावमधील सुखदेव ढवळे यांनी केला आणि अमलातही आणला. लेह - लडाख या बर्फाळ पहाडी भागात भारतीय लष्कराने राबवलेल्या आॅपरेशन मेघदूतमध्ये त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात ३१ मार्च १९८७ रोजी सुखदेव यांना वीरमरण आले, भारतमातेच्या कुशीत आणखी एक वीर योद्धा विसावला.
सन १९८७ मध्ये सियाचीन- ग्लेशियर या पहाडी भागावरून भारत- पाकमध्ये संघर्ष पेटला. समुद्र सपाटीपासून ५ हजार ७५३ मीटर उंचीवर हिमानी पहाडी आहे. ही जागा आपली असल्याचा दावा पाकिस्तानने केला व त्यावर कब्जा मिळवण्यासाठी सैन्याची जमवाजमव सुरू केली. पाकिस्तानकडून अशा कुरापती कायम केल्या जात असत. १९८४ मध्ये या पहाडी भागाचे मोजमाप करण्यासाठी पाकिस्तानने एका जपानी कंपनीला ठेका दिला होता. भारतानेही लगेच १३ एप्रिल १९८४ ला सियाचीन- ग्लेशियरला नियंत्रण रेषा आखण्याची योजना जाहीर केली. पाकिस्तानी आत्मघातकी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी भारताने मेघदूत आॅपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला. समुद्रसपाटीपासून सुमारे साडेपाच हजार मीटर उंचीवर असलेल्या हिमानी टेकडीवर सुरुवातीला ३०० सैनिकांना हेलिकॉप्टरने पाठविण्यात आले. या मोहिमेत श्रीगोंदा येथील ऊख्खलगावच्या सुखदेव ढवळे यांचा समावेश होता.
७० किलोमीटर लांबीच्या हिमानी टेकडीवर भारत - पाक सैन्यात आमने-सामने गोळीबार सुरू झाला. नियंत्रण रेषेचे काम सुरू असायचे व पाकिस्तानचे सैनिक गोळीबार करत असत. सुखदेवच्या तुकडीवर त्याला रोखण्याची जबाबदारी होती. समोरासमोर अशांत वातावरण असायचे व अचानक गोळीबार सुरू व्हायचा.
रोज अशी चकमक एकदा तरी व्हायचीच. ३१ मार्चलाही असेच झाले. पाकिस्तानने कुरापत काढली. सुखदेव सर्वात पुढे होते. त्यांनी आपल्या एके-४७ रायफलमधून दहा-बारा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठविले. त्यांचाही गोळीबार सुरूच होता. अशाच एका गोळीने सुखदेव यांच्या बरोबर मस्तकाचाच वेध घेतला. जागेवर त्यांनी वीरगती प्राप्त झाली. यावेळी हिमवृष्टी सुरु होती.
शहीद झाल्यानंतर सुखदेव यांचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनी सापडला. भारतीय सैन्य दलाने तिकडेच लष्करी इतमामाने सुखदेव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आठ दिवसांनी सुखदेव यांची कपडे, रोजच्या साहित्याची पेटी व अस्थी उख्खलगावमध्ये आल्या. ढवळे परिवार दु:खात बुडाला. श्रीगोंदा तालुक्यातील उख्खलगाव येथील मगन व समाबाई ढवळे यांना ज्ञानदेव, सुखदेव, तुकाराम आणि संपत ही चार मुले. दुष्काळी परिस्थिती असल्याने सातत्याने उपासमार व्हायची. अशा परिस्थितीत सुखदेव यांनी उख्खलगावमध्ये सातवीपर्यत शिक्षण घेतले.
पाचवी - सहावीत असताना इंग्रजांशी संघर्ष करणाऱ्या क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांच्या पराक्रमाचा इतिहास वाचण्यास आला. ‘आपले नाव तर सुखदेव आहे मग आपल्यात काय कमी आहे, आपणही देशासाठी लढू, देशासाठी वेळप्रसंगी प्राणही देऊ’, अशी भीष्मप्रतिज्ञा करून सुखदेव भारतीय सैन्य दलात भरती झाले. सैन्यात भरती झाल्यानंतर सुखदेव देशाच्या रक्षणासाठी प्रत्येक क्षणी पुढे सरसावत राहिले. मगन व समाबाई यांनी सुखदेव यांचे लग्न करण्याचे ठरविले. म्हसे येथील बापूराव देवीकर यांची कन्या शारदा यांच्याबरोबर ५ जून १९८३ रोजी सुखदेव विवाहबध्द झाले. २५ मार्च १९८५ रोजी या वीरपुत्राला कन्यारत्न प्राप्त झाले. सुखी संसार सुरू असतानाच त्यांच्यावर नियतीने अशी वेळ आणली.
सुखदेव यांची मुलगी सुरेखा शिक्षिका आहे. त्यांची पत्नी शारदाबाई यांनी तिला शिकवण्यासाठी भरपूर कष्ट केले. सुखदेव शहीद झाले त्याला आता ३२ वर्षे झाली. पण आई व मुलगीही सुखदेव यांचे बलिदान विसरलेले नाही. देशासाठी प्राण अर्पण करणारे सुखदेव हीच त्यांची खरी प्रेरणा आहे. त्यांच्या स्मरणार्थ उख्खलगाव व म्हसे येथील प्राथमिक शाळेच्या प्रत्येकी दोन खोल्या डिजिटल करण्याचा त्यांचा विचार आहे.
शब्दांकन - बाळासाहेब काकडे