शूरा आम्ही वंदिले : भारत-पाक युध्दातील नायक, कान्हू कोरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:42 PM2018-08-19T12:42:54+5:302018-08-19T12:46:01+5:30

१९७१ साली भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले़ त्यावेळी कान्हू व त्यांची पत्नी कृष्णाबाई मिलिटरी क्वार्टरमध्ये सोबत राहत होते़ कान्हू कोरके यांनी पत्नीला घरी सोडण्यासाठी प्रवास रजा मिळविली़ पत्नीला घरी सोडले आणि कोणालाही न सांगता रात्री घरातून बाहेर पडले़ ते पोहोचले थेट पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) -भारत सीमारेषेवर जेथे युद्धाची आग धगधगत होती.

Shoora We Vandilay: The hero, Kanhu Korake, in the Indo-Pak war | शूरा आम्ही वंदिले : भारत-पाक युध्दातील नायक, कान्हू कोरके

शूरा आम्ही वंदिले : भारत-पाक युध्दातील नायक, कान्हू कोरके

ठळक मुद्देनायक कान्हू कोरकेजन्मतारीख १ जून १९४१​​​​​​​ सैन्यभरती १८ डिसेंबर १९६१वीरगती १ डिसेंबर १९७१वीरपत्नी कृष्णाबाई कान्हू कोरके

१९७१ साली भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले़ त्यावेळी कान्हू व त्यांची पत्नी कृष्णाबाई मिलिटरी क्वार्टरमध्ये सोबत राहत होते़ कान्हू कोरके यांनी पत्नीला घरी सोडण्यासाठी प्रवास रजा मिळविली़ पत्नीला घरी सोडले आणि कोणालाही न सांगता रात्री घरातून बाहेर पडले़ ते पोहोचले थेट पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) -भारत सीमारेषेवर जेथे युद्धाची आग धगधगत होती.
२५ मार्च १९७१ पासून पाकिस्तानने सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु केली होती़ २३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने अधिकृत युद्धाची घोषणा केली़ त्यानंतर सीमेवर जोरदार धुमश्चक्री सुरु झाली़ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रांचीवरुन मराठा बटालियन भारत - पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) सीमेवर पोहोचली़ त्यात कान्हू कोरके यांचा समावेश होता़ मराठा बटालियन वेगवेगळ्या तुकड्यांत विखुरली गेली़ एका तुकडीची जबाबदारी नायक कान्हू कोरके यांच्यावर सोपविण्यात आली़ या तुकडीत दहा ते बारा जवानांचा समावेश होता़ पूर्वेकडून पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर जोरदार मारा सुरु केला़ अधिकृत आकडेवारीनुसार ३ डिसेंबर १९७१ साली पाकिस्तानकडून भारतावर थेट हवाई हल्ला करण्यात आला. मात्र, तत्पूर्वीच पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार बॉम्बवर्षाव, गोळीबार सुरु झाला होता़ भारतीय सैन्यही त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करीत होते़ मराठा बटालियनच्या एका तुकडीचे नेतृत्व करीत असलेल्या कोरके यांच्यावर पाकिस्तानच्या सैन्याने ढाकानजीक अचानक गोळीबार आणि हॅण्डग्रेनेडने हल्ला केला़ त्यात कान्हू कोरके यांच्यासह त्यांचे सहकारी शहीद झाले़ तो दिवस होता १ डिसेंबर १९७१़
आठवडाभरानंतर कान्हू कोरके यांना भारत-पाकिस्तान युद्धात वीरमरण आल्याची तार कृष्णाबाई यांना मिळाली़ त्यांना धक्काच बसला़ अवघ्या सतरा महिन्यात कृष्णाबाई यांचा संसार मोडला होता़ त्यांचे अश्रू अनावर झाले़ एका बाजूला पती देशासाठी कामी आल्याचा अभिमान तर दुसऱ्या बाजूला फक्त १७ महिन्यांचाच सहवास नशिबी आल्याचे दु:ख होते़
हॅण्डग्रेनेडमध्ये छिन्नविछिन्न झालेले कोरके यांचे पार्थिवही गावी येऊ शकले नाही़ किमान अंत्यदर्शन तरी व्हावे, अशी वीरपत्नी कृष्णाबाई यांची इच्छा होती़ पण दुर्दैवाने ती इच्छाही त्यांची अपुरी राहिली़
वीरपतीच्या निधनानंतर कृष्णाबाई अस्वस्थ झाल्या़ काही दिवस माहेरी महालक्ष्मी हिवरे (ता़ नेवासा) येथे त्या राहिल्या़ तेथून पुन्हा सासरी वांबोरी (ता़ राहुरी) येथे आल्या़ वांबोरी येथे घर बांधून राहू लागल्या़ एक मुलगी दत्तक घेतली़ आता त्या मुलीचेही लग्न झाले असून, मुलगी सुवर्णा व जावई मल्हारी शिंदे हे कृष्णाबाई यांची देखभाल करीत आहेत़
वांबोरी (ता़ राहुरी) येथील लक्ष्मण व ठकूबाई या दाम्पत्याच्या पोटी १ जून १९४१ साली कान्हू कोरके यांचा जन्म झाला़ त्यांना गेणू, नामदेव व शंकर असे तीन भाऊ व चंद्रभागा, द्रौपदा या दोन भगिनी होत्या़ जेमतेम शिक्षण घेऊन कान्हू यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्न सुरु केले़ मित्र तुकाराम सुपेकर व खंडू सोनवणे यांच्याबरोबर कान्हू कोरके हे १८ डिसेंबर १९६१ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी मराठा लाईट रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते़ महालक्ष्मी हिवरे (ता़ नेवासा) येथील सोनाबाई व आसाराम गायके यांची कन्या कृष्णाबाई यांच्याशी ३ जून १९६९ मध्ये कान्हू कोरके विवाहबद्ध झाले़ त्यावेळी कृष्णाबाई यांचे वय अवघे चौदा-पंधरा वर्ष होते़ लग्न झाले त्यावेळी कान्हू कोरके रांची येथे होते़ लग्नानंतर ते पत्नी कृष्णाबाई यांना घेऊन रांची येथे गेले़ मात्र, १९७१ साली जेव्हा भारत-पाकिस्तान सीमेवर जोरदार धुमश्चक्री झडू लागल्या, तेव्हा कान्हू यांनी पत्नी कृष्णाबाई यांना घेऊन गाव गाठले़ त्यांना घरी ठेवले़ त्यांची आई ठकूबाई या कान्हू यांना पुन्हा सैन्यदलात जाऊ देत नव्हत्या़ युद्धात काहीही होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते़ पण कान्हू कोरके यांनी आईला न सांगताच रात्री घर सोडले अन् थेट रांचीचा आर्मी कॅम्प गाठला़ तेथून ते युद्धभूमिवर हजर झाले़

शहीद स्मारकाचा प्रश्न धूळखात
कान्हू कोरके हे शहीद झाल्याच्या घटनेला १ डिसेंबर रोजी ४७ वर्ष पूर्ण होणार आहेत़ वांबोरीचे नाव देशसेवेसाठी उज्ज्वल करणाºया कान्हू कोरके यांचे स्मारक बांधावे, अशी अनेक वर्षांपासून गावकºयांची इच्छा होती़ गेल्या वर्षी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ यावेळी अ‍ॅड़ सुभाषराव पाटील हेही उपस्थित होते़ स्मारकासाठी जागा उपलब्ध असूनही अद्याप स्मारकाचा प्रश्न धूळखात पडला आहे़ नायक शहीद कोरके यांचे स्मारक पूर्ण व्हावे व इतरांना प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़

दुस-या लग्नाचा प्रस्ताव धुडकावला
कान्हू कोरके शहीद झाले त्यावेळी कृष्णाबाई यांचे वय अवघे सोळा- सतरा वर्षे होते़ त्यामुळे कृष्णाबाई यांनी दुसरे लग्न करावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती़ मात्र देशासाठी बलिदान देणाºया शहीद पतीचे नाव का पुसून टाकू, असा सवाल कृष्णाबाई यांनी करीत आई-वडिलांचा प्रस्ताव धुडकावून लावला़ त्यानंतर आई-वडिलांनी कधीही पुनर्विवाहाचा विषय काढला नाही़
वीरमातेचाही राखला सन्मान
कान्हूबाई यांना त्यावेळी अल्प पेन्शन मिळायची़ त्यातील काही रक्कम त्या सासू ठकूबाई यांना देत़ तसेच सरकारकडून मिळालेली रक्कम सासू व कान्हूबाई यांचे जॉर्इंट अकाऊंट काढून त्यात त्यांनी टाकली़ पुढे सासू ठकूबाई यांचे निधन झाल्यानंतर ती रक्कम त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरली़

माझी सध्या कुटुंबाला नाही तर देशाला गरज आहे़ मी मातृभूमिचे रक्षण केले तरच माझे बांधव सुरक्षित राहतील़ मी जगलो, वाचलो तर परत येईल़ अन्यथा देशाच्या कामी येईल़ माझी काळजी करू नका, तुमची काळजी घ्या़ - जयहिंद!
देशासाठी असा सर्वोच्च समर्पण भाव कान्हू कोरके यांनी युद्धभूमिवरुन आई, वडील आणि बायकोला पाठविलेल्या पत्रात व्यक्त केला होता़ असा समर्पण भाव प्रत्येक सैनिकाच्या ठायीठायी भरलेला असतो़ या समर्पण वृत्तीतूनच कान्हू कोरके यांनी भारत-पाकिस्तान युद्धात सर्वस्व वाहिले़ ‘माझा भारत वाचला पाहिजे, असे म्हणत कान्हू कोरके पाकिस्तानी सैनिकांवर तुटून पडले़ भारत वाचला़ पण कान्हू कोरके शहीद झाले़



शब्दांकन - भाऊसाहेब येवले

Web Title: Shoora We Vandilay: The hero, Kanhu Korake, in the Indo-Pak war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.