शूरा आम्ही वंदिले : शिंगव्याचा शौर्यवान, जगन्नाथ जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:06 PM2018-08-15T13:06:51+5:302018-08-15T13:15:06+5:30

नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील चागंदेव खंडू जाधव व द्रौपदाबाई जाधव हे दाम्पत्य मोलमजुरी करुन उपजीविका भागवित होते.

Shoora We Vandilay: Shingwani Brave, Jagannath Jadhav | शूरा आम्ही वंदिले : शिंगव्याचा शौर्यवान, जगन्नाथ जाधव

शूरा आम्ही वंदिले : शिंगव्याचा शौर्यवान, जगन्नाथ जाधव

ठळक मुद्देशिपाई जगन्नाथ जाधवजन्मतारीख १ जून १९७४सैन्यभरती १९९४वीरगती १७ सप्टेंबर १९९९सैन्यसेवा पाच वर्षेवीरपत्नी सविता जगन्नाथ जाधव

नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील चागंदेव खंडू जाधव व द्रौपदाबाई जाधव हे दाम्पत्य मोलमजुरी करुन उपजीविका भागवित होते. या कष्टकरी कुटुंबाच्या घरात १ जून १९७४ रोजी जगन्नाथ जाधव यांचा जन्म झाला. चांगदेव जाधव यांना दोन अपत्य़ मोठे जगन्नाथ तर लहान रावसाहेब.चांगदेव आणि द्रोपदाबाई यांनी काबाडकष्ट करुन मुलांचे शिक्षण केले़ लहानपणापासून जिज्ञासू, वृत्ती, शांत व संयमी स्वभाव, अडचणी असणाऱ्यांना कायम मदतीचा हात देणारे जगन्नाथ यांचे माध्यमिक शिक्षण देहरे (ता. नगर) येथे झाले़ पुढे बारावीपर्यंत शिक्षण राहुरी येथे झाले.
विद्यापीठाच्या ‘कमवा व शिका’ योजनेत काम करून जगन्नाथ यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मिळेल. ती नोकरी करण्याचा निर्णय जगन्नाथ यांनी घेतला. मात्र इतर ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा भारतीय सैन्यदलात नोकरी केली तर माता-पित्यांसह भारतमातेचीही सेवा हातून घडेल या उदात्त हेतूने जगन्नाथ यांनी लष्करात नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि १९९४ साली ते पुणे येथे भरती झाले.
बेळगाव येथे त्यांचे एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. १९९५ साली ते गावी रजेवर आले तेव्हा आई-वडिलांनी त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यातील वरवंडी गावातील सविता यांच्याशी त्यांचे लग्न ठरले. १२ जून १९९५ रोजी जगन्नाथ व सविता यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. लग्नानंतर काही दिवसांतच प्रशिक्षणानंतरची सुट्टी संपली आणि जगन्नाथ यांची गुजरातमधील जामनगर येथे पोस्टिंग झाले.
या ठिकाणी त्यांनी काही वर्षे सेवा केली़ त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याने कारगील युद्ध सुरू झाले. इतर सैन्यांसह जगन्नाथ यांचीही काश्मीर राज्यात बदली झाली. याच काळात ३० आॅगस्ट १९९८ ला जगन्नाथ आणि सविता यांना कन्यारत्न प्राप्त झाले. कन्येचे नाव आवडीने सोनाली ठेवण्यात आले. १९९९ हे साल हे भारतीय इतिहासात अजरामर होण्यासाठी उजाडले होते. जगन्नाथ यांच्या तुकडीला काश्मीरच्या सियाचीन ग्लेशियर या प्रांतात पाठविण्यात आले. १९९९ मध्ये पाकिस्तानकडून ग्लेशियर भागात सतत घुसखोरी व गोळीबार करण्याचे प्रमाण वाढले होते.
भारतीय हद्दीत घुसखोरी करून बसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना उखडून फेकणे हेच प्रत्येक सैनिकांसमोर ध्येय होते. रात्रंदिवस युध्द सुरू होते. कधी कोठून गोळीबार होईल सांगता येत नव्हते. शत्रूंच्या सैन्याचा प्रतिकार करत भारतीय जवान भारतमातेसाठी पुढे जात होते. याच दरम्यान १७ सप्टेंबर १९९९ रोजी ग्लेशियर परिसरातील दुर्गम भागात भारतीय लष्कराची एक तुकडी शत्रंूचा प्रतिकार करत होती. या तुकडीत जगन्नाथ याचाही समावेश होता. त्यांनी मोठा पराक्रम करत अनेक शत्रूंना यमसदनी पाठविले़ याचवेळी शत्रूंकडून हॅण्डग्रेनेड आणि झालेल्या गोळीबारात जगन्नाथ शहीद झाले़ आपली पाच वर्षांची सेवा भारतमातेच्या स्वाधीन करुन हा वीर जवान भारतमातेच्या कुशीत विसावला गेला. १९ सप्टेंबर रोजी लष्कराचे काही जवान शिंगवेनाईक गावात जगन्नाथ यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी आले़ जगन्नाथ शहीद झाल्यानंतर ५ दिवसानंतर २२ सप्टेंबर १९९९ रोजी शिंगवेनाईक येथे शहीद जगन्नाथ यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आणण्यात आले़
जगन्नाथ शहीद झाल्याची बातमी समजताच पंचक्रोशीतील हजारो लोकांनी मोठी गर्दी केली होती़ जगन्नाथ यांचे पार्थिव पाहून आई द्रोपदाबाई यांनी हंबरडा फोडला़ वडील चांगदेव यांच्याही अश्रूंचा बांध फुटला़ गावातील जेष्ठ मंडळी जाधव कुटुंबीयांचे सांत्वन करत होते तर वीरपत्नी सविताताई आपल्या एका वर्षाच्या सोनालीला पोटाशी धरून धाय मोकलून रडत होत्या़ सविताताई यांच्या दु:खाला अंत राहिला नाही. हजारो ग्रामस्थांच्या उपस्थित शहीद जगन्नाथ यांना लष्करी इतमामात बंदुकीच्या ७ फैरी झाडून अखेरचा निरोप देण्यात आला.
वीर पत्नीने सांभाळला संसार
जगन्नाथ शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सविता यांनी मोठ्या हिमतीने संसार सांभाळला़ सविता या सध्या मुलीसह नगर शहरात राहत आहेत़ मुलगी सोनाली महाविद्यालयात शिक्षण घेते़ तर जगन्नाथ यांचे आई-वडील व भाऊ शिंगवेनाईक येथे स्थायिक आहेत़
ग्रामस्थांनी उभारले स्मारक
शहीद जगन्नाथ जाधव यांचे शौर्य सर्वांना माहित व्हावे, गावातील तरूणांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने शिंगवे नाईक ग्रामस्थांनी गावात त्यांचे स्मारक उभारले आहे़ जगन्नाथ यांचा आदर्श घेत गावातील अनेक तरूणांनी सैन्यदलात भरती होणे पसंत केले आहे़
भारत सरकारकडून गौरव
शहीद जगन्नाथ यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. त्यांचा पराक्रम व शौर्य अवर्णनीय होते म्हणून भारत सरकारने त्यांना मरणोत्तर सेना पदक देऊन सन्मानित केले. दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात वीरपत्नी सविता यांनी हे पदक स्वीकारले. 

शब्दांकन : अरूण वाघमोडे

Web Title: Shoora We Vandilay: Shingwani Brave, Jagannath Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.