शूरा आम्ही वंदिले : शौर्यचक्राचा मानकरी, हवालदार त्रिंबक निमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:25 PM2018-08-14T12:25:03+5:302018-08-14T12:25:09+5:30

हवालदार त्रिंबक दादा निमसे हे २६ मराठा लाइट इन्फंट्रीत आसाममध्ये तैनात होते.

Shoora We Vandili: Shaurikachra Chakra, Havaladar Trimbak Nimsee | शूरा आम्ही वंदिले : शौर्यचक्राचा मानकरी, हवालदार त्रिंबक निमसे

शूरा आम्ही वंदिले : शौर्यचक्राचा मानकरी, हवालदार त्रिंबक निमसे

हवालदार त्रिंबक दादा निमसे हे २६ मराठा लाइट इन्फंट्रीत आसाममध्ये तैनात होते. त्यावेळी आसामध्ये युनायटेड लिब्रेशन फ्रंट ही आतंकवादी संघटना कार्यरत होती. यातील काही आतंकवादी एका गावात लपल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर १९ मार्च १९९१ रोजी हवालदार निमसे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक आतंकवाद्यांच्या शोधार्थ निघाले. लष्कराची वाहने येत असल्याचे पाहून आतंकवादी पळू लागले. लष्कराने त्यांचा पाठलाग केला. यात त्रिंबक निमसे यांनी एका आतंकवाद्याचा खात्मा केला. परंतु या झटापटीत त्यांनाही वीरमरण आले.
नगर तालुक्यातील मांडवे येथे दादा व अनुसया निमसे या दाम्पत्याच्या पोटी १ मे १९५६ रोजी त्रिंबक यांचा जन्म झाला. चार भावांमध्ये ते सर्वात लहान. लहानपणापासूनच लष्कराची आवड असल्याने बेळगाव येथे वयाच्या अठराव्या वर्षी १९७४ मध्ये ते लष्करात भरती झाले. ते २६ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये ते रुजू झाले़
देशभरात विविध ठिकाणी सेवा केल्यानंतर १९९१ मध्ये आसाममध्ये त्यांची बदली झाली़ त्यावेळी आसामध्ये युनायटेड लिब्रेशन फ्रंट आॅफ आसाम (उल्फा) ही आतंकवादी संघटना कार्यरत होती. यातील काही आतंकवादी एका गावात लपल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर १९ मार्च १९९१ रोजी हवालदार निमसे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक आतंकवाद्यांच्या शोधार्थ निघाले. निमसे त्या तुकडीचे प्रमुख होते. ज्या झोपडीत आतंकवादी लपले होते, त्याला निमसे यांच्या तुकडीने घेराव घातला. आतंकवाद्यांना कोणताही सुगावा लागू नये म्हणून सैन्य रांगत रांगत झोपडीपर्यंत पोहोचले. तुकडीतील सुभेदार यशवंत राव यांनी झोपडीचा दरवाजा वाजवला. त्यामुळे आत असलेला खतरनाक आतंकवादी अमृत राभा खिडकीतून उडी मारून पळाला. क्षणाचाही विलंब न करता हवालदार निमसे यांनी त्याचा पाठलाग सुरू केला व काही वेळातच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून झडती घेतली असता, त्याच्याकडे २० हजार ५५० रूपये सापडले. पथकाने त्याला लष्करी हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याच्या सांगण्यावरून भारतीय पथकाने उल्फाच्या दोन महिला साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हाटी गावात उल्फाचे २५ आतंकवादी लपल्याची महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. त्यामुळे लष्कराने या मोहिमेसाठी चार अधिकारी व ३० जणांच्या बहादूर तुकडीची निवड केली. हे पथक तात्काळ हाटी गावात पोहोचले. लष्कराची वाहने येत असल्याचे पाहून आतंकवादी पळू लागले. लष्कराने त्यांचा पाठलाग केला. निमसे हेही यातील एका आतंकवाद्याच्या मागे पळाले. स्वत:ला वाचवण्यासाठी आतंकवाद्याने नाल्यात उडी मारली. निमसे यांनीही नाल्यात उडी मारून त्याला पकडले. नाल्यातच दोघांची झटापट सुरू झाली. रात्रभर ते पाण्यात होते. अखेर सकाळी लष्कराने निमसे यांच्या शोधार्थ पाहणी केली असता, त्या नाल्यात निमसे यांच्यासह त्या आतंकवाद्याचा मृतदेह आढळून आला. अशा प्रकारे निमसे यांनी मोठ्या साहसाने देशासाठी प्राण अर्पण केले. आॅपरेशन बजरंगी नावाने हे आॅपरेशन राबविण्यात आले़
आॅपरेशन बजरंगी या युद्धामध्ये अतुलनीय शौर्य गाजवून देशासाठी शहीद झालेल्या हवालदार त्रिंबक निमसे यांचा सैन्याकडून १९९२मध्ये मरणोत्तर शौर्यपदक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. निमसे यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी हे शौर्यपदक दिल्लीमध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते स्वीकारले. त्यावेळी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, संरक्षणमंत्री शरद पवार, तसेच तिन्ही सेनादलाचे प्रमुख उपस्थित होते.
शासनाकडून उपेक्षा
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कृषी प्रयोजनार्थ जमीन देण्याची तरतूद आहे. निमसे यांच्या कुटुंबाने नगर तहसीलदारांकडे जमीन मिळण्याबाबत अर्ज केला आहे. त्यावर तहसील कार्यालयाने इसळक येथील शासकीय जमीन देण्याबाबत पाठपुरावा केला. परंतु इसळक ग्रामपंचायतीने जमीन देण्याबाबतचा ठराव नामंजूर केला. त्यामुळे तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अभिप्राय मागवला आहे. या प्रक्रियेला वर्ष लोटले तरी निमसे यांचे प्रकरण धूळखात पडले आहे. माजी सैनिकांना देण्यात येणाºया जमीन वाटपामध्ये शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले असतानाही हे प्रकरण रखडले आहे.

शब्दांकन : चंद्रकांत शेळके

Web Title: Shoora We Vandili: Shaurikachra Chakra, Havaladar Trimbak Nimsee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.