शूरा आम्ही वंदिले : हसत हसत कवटाळले मृत्यूला, शहीद संतोष जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:47 PM2018-08-14T12:47:07+5:302018-08-14T12:52:58+5:30
कारगील जिल्ह्यातील द्रास हे शहर समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर वसलेले़ बर्फाळ प्रदेश आणि उंचच उंच पर्वतरांगा.
कारगील जिल्ह्यातील द्रास हे शहर समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर वसलेले़ बर्फाळ प्रदेश आणि उंचच उंच पर्वतरांगा. या पर्वतरांगामधून वाट काढत सहा भारतीय जवानांचे एक वाहन सैन्याच्या मुख्य तळाकडे जात होते. उंच टेकडीवर लपलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी अचानक या जवानांच्या गाडीवर बॉम्ब वर्षाव सुरु केला. या जवानांमध्ये भोयरे गांगर्डा येथील संतोष जगदाळे यांचाही समावेश होता. अचानक हल्ला होताच भारतीय जवानांनीही वाहनामधून अतिरेक्यांवर फायरिंग केली. मात्र, पाकिस्तानी अतिरेकी उंच डोंगरावर होते व ते अतिशय उंचीवरुन भारतीय जवानांवर लपून हल्ले करीत होते. प्रचंड प्रमाणात सुरु असलेला बॉम्ब वर्षाव आणि धुरांचे लोळ यामुळे भारतीय सैनिक अतिरेक्यांचा प्रतिकार करू शकले नाहीत.
शहीद संतोष जगदाळे हे पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील तबाजी व कौशल्या जगदाळे यांचे शूरवीर पुत्र. तबाजी हे सैन्यात होते. त्यामुळे त्यांचे देशपे्रम आणि भूमातेच्या रक्षणाचे धडे लहानपणापासून मिळालेले संतोषदेखील सैन्यात दाखल झाले. आई-वडिलांना एकुलता एक मुलगा. पण ‘देशसेवा फर्स्ट’ म्हणणाऱ्या तबाजी यांनी संतोष यांच्यामध्ये लहानपणापासूनच सैन्याची शिस्त व संस्कार रुजवले होते. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण भोयरे गांगर्डा येथे, तर रूई छत्रपती येथे माध्यमिक व उर्वरित शिक्षण शिरूरला झाले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात भरती होण्यासाठी संतोष यांनी तयारी सुरु केली होती. पुणे, बेळगाव येथे झालेल्या सैनिक भरतीत अपयश आले. पण त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. १९९९ मध्ये कुलाबा (मुंबई) येथे सैन्य भरती झाली. त्यासाठी ते मैदानात उतरले. शारीरिक चाचण्या आणि परीक्षेत टॉप करुन संतोष १२ जानेवारी १९९९ मध्ये देशसेवेसाठी भारतीय सैन्यात दाखल झाले. संतोष देशसेवेत रुजू झाल्याचा आई, वडिलांनाही आनंद झाला.
सन २००५ मध्ये पारगाव (ता. दौंड) येथील शीतल यांच्याबरोबर संतोष यांचा विवाह झाला. याच काळात त्यांनी अरूणाचल प्रदेश, इंदोर, जम्मू, हैदराबाद या ठिकाणी सेवा केली. या काळात त्यांना संचिता व प्रथमेश ही मुले झाली. हैदराबाद येथे बदली झाल्यावर त्यांनी पत्नी शीतल, मुलगी संचिता व मुलगा प्रथमेश यांना आपल्याबरोबर लष्करी निवासातच ठेवले होते. मुलांचे शिक्षणही तेथेच असल्याने सर्वच संसार सुरळीत चालला होता.
संतोष हे कारगील भागात तीन महिन्यांसाठी गेले होते. २ जुलै २०१५ रोजी सकाळी सात वाजता संतोष यांचा पत्नी शीतल यांना फोन आला, ‘‘माझी तीन महिन्यांची येथील सेवा संपून मी उद्या हैदराबादमध्ये येण्यास निघणार आहे. मात्र त्याच दिवशी दुपारी जवान संतोष जगदाळे यांच्यासह सहा जवान लष्करी वाहनातून कारगीलमधील द्रास भागातून येत असताना उंचच उंच टेकड्यांवरुन पाकिस्तानी अतिरेक्यांनी हातबॉम्बचा वर्षाव केला. अचानक हल्ला होताच भारतीय जवानांच्या वाहन चालकाने वाहनाचा वेग वाढविला. त्याचवेळी भारतीय जवान वाहनामधून अतिरेक्यांवर फायरिंग करु लागले़ मात्र, पाकिस्तानी अतिरेकी उंच डोंगरावर होते व ते अतिशय उंचीवरुन भारतीय जवानांवर लपून हल्ले करीत होते. प्रचंड प्रमाणात सुरु असलेला बॉम्ब वर्षाव आणि धुरांचे लोळ यामुळे भारतीय सैनिक अतिरेक्यांचा प्रतिकार करू शकले नाहीत. यात संतोष यांच्यासह सहा जवान शहीद झाले. ही वार्ता दुस-या दिवशी शीतल यांना कळवण्यात आली. त्यांना धक्काच बसला. त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. पण भारतमातेसाठी माझ्या पतीने लढा दिला याचा अभिमानही त्यांना होता. ५ जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर राळेगण थेरपाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीरपत्नीवर कुटुंबाची जबाबदारी
जवान संतोष जगदाळे हे कारगील युद्धात शहीद झाल्याने कुटुंबाची जबाबदारी पत्नी शीतल यांच्यावर आली. पतीच्या निधनानंतर त्याच युनिटमध्ये नोकरीचा प्रस्ताव शीतल यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. त्यासाठी शीतल यांनी संगणक शिक्षणही पूर्ण केले. परंतु तिथे संतोष यांच्याशिवाय मन रमेना म्हणून शीतल गावाकडे परतल्या. शिरूर येथे सासू कौशल्या व मीनाबाई, मुलगी संचिता, मुलगा प्रथमेश यांच्यासह शीतल राहत आहेत. सर्व कुटुंबाची जबाबदारी शीतल यांच्यावरच येऊन पडली आहे. महिन्याला मिळणा-या पेन्शनवरच त्यांची गुजराण सुरु असून, मुलांच्या पुढील शिक्षणाची चिंता त्यांना सतावतेय.
राळेगण थेरपाळमध्ये स्मारक
शहीद जवान संतोष जगदाळे यांचे मूळ गाव असलेल्या राळेगण थेरपाळ येथे जगदाळे कुटुंब तसेच पारनेर पंचायत समितीमधील बांधकाम अभियंता अजय जगदाळे व अमर जगदाळे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना एकत्रित करीत शहीद जवान संतोष जगदाळे यांचे स्मारक उभारले आहे. तेथे नियमित कार्यक्रमही होतात. शहीद जवान संतोष जगदाळे यांच्या स्मृती कायम रहाव्यात, यासाठी ग्रामपंचायतीने विधायक उपक्रम हाती घ्यावा, असे ग्रामस्थांना वाटते.
शासनाकडून दखल नाही
महाराष्ट्र शासनाने नागपूर येथे वीरपत्नी शीतल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव केला. एस.टी.चा मोफत प्रवासाचा पासही मिळाला आहे. पण त्याने मुलांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. म्हणून शीतल या शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत. शासकीय जमीन मिळावी, यासाठी त्यांनी प्रस्ताव दाखल केला आहे. पण अद्याप शासनाने दखल घेतली नाही, असे शीतल जगदाळे यांनी सांगितले.
शब्दांकन - विनोद गोळे