शूरा आम्ही वंदिले : वो डटा रहा आखिर तक, हवालदार नारायणराव भोंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:59 PM2018-08-14T12:59:20+5:302018-08-14T13:01:39+5:30

लेहपासून ८० किलोमीटर दूर असणाऱ्या ‘टेनकाम्पो टान्सी’ येथे प्रचंड हिमवर्षाव सुरु होता. स्थानिक प्रवाशांची एक गाडी बर्फात फसली होती. तेथून जाणाºया जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी फसलेली गाडी बाहेर काढली.

Shoora We Wandile: It was Datta till the end, Havaldar Narayanrao Bhonde | शूरा आम्ही वंदिले : वो डटा रहा आखिर तक, हवालदार नारायणराव भोंदे

शूरा आम्ही वंदिले : वो डटा रहा आखिर तक, हवालदार नारायणराव भोंदे

ठळक मुद्देहवालदार नारायणराव भोंदेजन्मतारीख २१ डिसेंबर १९७७सैन्यभरती २१ आॅक्टोबर १९९६वीरगती ०३ एप्रिल २०१५सैन्यसेवा सुमारे १८ वर्षे ४ महिनेवीरपत्नी अंबिका नारायण भोंदे

लेहपासून ८० किलोमीटर दूर असणाऱ्या ‘टेनकाम्पो टान्सी’ येथे प्रचंड हिमवर्षाव सुरु होता. स्थानिक प्रवाशांची एक गाडी बर्फात फसली होती. तेथून जाणाºया जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी फसलेली गाडी बाहेर काढली. सर्व लोकांची सुखरूप सुटका केली. परंतु आता जवानांचीच गाडी फसली. फसलेली गाडी काढण्यात ६ जवान गुंतले होते. हिमवर्षाव जोरात सुरुच होता. बर्फाचे मोठे स्लायडिंग झाले, त्यात ६ जवान वाहू लागले. ६ पैकी ४ जवान प्रोटेक्शन बॅग काढून स्लीपिंग जम्प मारल्याने बचावले. उर्वरित दोन जवान मात्र बर्फाच्या जोरदार स्लायडिंगमुळे दूरवर वाहून गेले. त्यात आपले नारायण भोंदे होते.
डोंगरकुशीत वसलेल्या आणि निसर्गरम्य वातावरण असलेल्या नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी या गावात रघुनाथ भोंदे व छबूबाई भोंदे यांच्या पोटी २१ डिसेंबर १९७७ रोजी नारायणराव यांचा जन्म झाला. हे कुटुंब शेतकरी असल्याने शेतीत दिवसभर राबायचं आणि जे पिकेल त्यावर गुजराण करायची. वडील रघुनाथरावांची दिनचर्या शेतीवरच सुरु व्हायची आणि तेथेच संपायची. सारे घर शेतीवरच अवलंबून होते. रघुनाथराव यांना दोन मुले आणि एक मुलगी असे तीन अपत्य. नारायण हे सर्वात मोठे आणि हसत खेळत जगणारे. म्हणून त्यांचा स्वभाव सर्वांना आवडायचा. गावात खेळले जाणारे गावरान खेळ ते लहानपणी खेळत. सर्वांशी आपुलकीने आणि आदराने वागण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते सर्वांचे स्नेही बनले होते. कधीही त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही. वडिलांनी दिलेले संस्कार त्यांनी आपल्या आचरणात आणले. घरातील दोन लहान भावंडांना प्रेमाची सावली देणारे, त्यांना जीव लावणारे असल्याने त्यांनी आपल्या भावंडांचे जीवन फुलवण्यासाठी मोठी मेहनत घेतली.
नारायण यांचे लहानपण असे मजेत जात होते. आता शाळा शिकण्याचे वय झाल्याने वडिलांनी त्यांना शाळेत घातले. गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय असल्याने त्यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षणाची सोय गावात नव्हती. त्यासाठी त्यांना नगर शहरातील नगर कॉलेज येथे शिक्षणासाठी यावे लागले. शिक्षण सुरू असतानाच २१ आॅगस्ट १९९६ रोजी ते पुणे येथे लष्करात भरती झाले. जवान बनून देशसेवा करावी म्हणून त्यांनी लष्करी सेवा निवडली. घरात सर्वांचा त्यांच्यावर जीव होता. या सर्वांना सोडून त्यांनी आता भारत मातेची सेवा करण्याचे ठरवले होते. भरती झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण बंगलोर येथे झाले. देशसेवेने भारावलेल्या नारायण यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली ती पठाणकोट (पंजाब) येथे. यानंतर गया येथे सेवा सुरु असतानाच त्यांचा विवाह २६ नोहेंबर २००३ मध्ये त्यांच्याच मामाच्या मुलीशी झाला. जीवनभर एकमेकांशी साथ करण्याच्या आणाभाका घेत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. अंबिकाताई यांच्या रूपाने नारायण यांना मनपसंत जीवनसाथी मिळाली. एकमेकांशी साथसंगत करत, हसतखेळत त्यांच्या संसाररुपी वेल बहरत होता.
नंतर गयावरून त्यांची पोस्टिंग बंगलोर येथे झाली. याच काळात त्यांना पुत्ररत्न झाले. घरच्यांनी ही आनंदाची बातमी दिल्यानंतर नारायण यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. असेच हसत खेळत आनंदाचे दिवस सुरु होते. बंगलोरवरून त्यांची बदली जम्मू काश्मीर येथे झाली. १५ सेक्टर राष्ट्रीय रायफल या युनिटशी ते जोडले गेले़ काश्मीर खरे तर जगाचे स्वर्ग, पण दहशतवादामुळे या स्वर्गाचे सौंदर्य रक्ताने माखत होते. याच काळात म्हणजे २००८ मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. आता तर आनंदाला पारावर राहिला नाही. मुलगा अनुज आणि मुलगी अनुष्का यांच्या येण्याने नारायण यांच्या सुखाला चार चाँद लागले. अधूनमधून ते गावाकडे येत. सर्वांची आपुलकीने विचारपूस करत. गावकरी व जुने मित्र यांच्या गलक्यात नारायण हरवून जात. जुन्या गप्पा, जुन्या आठवणी, शाळेतील धमाल यांचे किस्से आठवत त्यांची चर्चा झडत. शेतकºयाचा पोरगा असल्याने लष्करात असला तरी नारायण सुट्टीत शेतीत रमून जात. वडील शेतीमाल नगरला विकायला नेत, तेव्हा ते त्यांना आठवणीने भेळ आणा म्हणून सांगायला विसरत नसत. वडील-मुलाचे स्नेहाचे संबंध होते.
जम्मू काश्मीरनंतर दिल्ली, गुवाहाटी, लेह (काश्मीर ) येथे त्यांची पोस्टिंग झाली. २ डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना लेह येथे येऊन जेमतेम ४ महिने झाले होते. लेहपासून ८० किलोमीटर दूर असणाºया ‘टेनकाम्पो टान्सी’ या ठिकाणी त्यांची नेमणूक होती. हा संपूर्ण प्रदेश हिमाच्छादित होता. दळणवळण करण्याचे सर्व मार्ग बंद होते. त्यामुळे तेथील चेकपोस्ट नाका बंद करण्यात आला होता. रहदारी पूर्ण थांबली होती. ३ एप्रिल २०१५ रोजी हेडक्वॉर्टरकडून निरोप आला, बर्फ कमी झाला असून रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे बंद केलेले चेकपोस्ट पुन्हा उघडले गेले. रस्त्याने पुढे जात असताना १७ हजार ६०० फूट उंचावर बर्फाने वेढलेल्या एका पोस्टजवळ स्थानिक लोकांची गाडी बर्फात फसली होती.
नारायण व त्यांचे साथीदार याच मार्गावरून जात होते. संकटात असणाºयांना मदत करणे जवानाचे काम़ म्हणून त्यांच्या सोबत असणाºया लष्करी दोन गाड्या मदतीसाठी थांबल्या. त्यात एकूण ६ जवान बसले होते. समोरची गाडी निघत नसल्याने सहाही जवान खाली उतरले. बरेच प्रयत्न करून त्या जवानांनी फसलेली गाडी बाहेर काढली. सर्व लोकांची जवानांनी सुटका केली. पण पुढे जात असताना त्यांची गाडी त्याच खड्ड्यात फसली. ज्यांनी लोकांना मृत्यूच्या दारातून परत आणले, तेच आता मृत्यूच्या दारात होते. वरून प्रचंड हिमवर्षाव सुरु होता. फसलेली गाडी काढण्यात ६ जवान गुंतले होते. हिमवर्षाव जोरात सुरुच होता. बर्फाचे मोठे स्लायडिंग झाले, त्यात हे ६ जवान वाहू लागले. ६ पैकी ४ जवान प्रोटेक्शन बॅग काढून स्लीपिंग जम्प मारल्याने बचावले. उर्वरित दोन जवान मात्र बर्फाच्या जोरदार स्लायडिंगमुळे दूरवर वाहून गेले. त्यात आपले नारायण होते. स्थानिक नागरिक, लष्कर, सर्व यंत्रणा नारायण यांचा शोध घेत होती. सलग ४२ दिवस त्यांची शोधमोहीम सुरु होती. दिवस-रात्र नारायण यांचा शोध सुरु होता. सर्वांच्या अथक श्रमाला ४२ व्या दिवशी यश मिळाले. नारायण मृतावस्थेत बर्फात दबलेले आढळले. दुसºयांना वाचवता वाचवता त्यांना वीरमरण आले.
शूर पुत्राचे बलिदान...
एका शूर पुत्राने जगाचा अखेरचा निरोप घेतला. कुटुंबीयांनी फोडलेला टाहो आजही गाव विसरू शकले नाही. लहानगी अनू, मुलगा अनुज यांना पोरके करून नारायण यांनी जगाचा निरोप घेतला. अंबिकातार्इंनी मुलांच्या भवितव्यासाठी कंबर कसली. लष्करी मदतीचा हात मिळाला. त्यांना एम.आय.आर.सी. येथे स्कूल टीचर म्हणून जॉब मिळाला. घराला आर्थिक आधार सापडला. दोन्ही अनुंचे शिक्षण लष्करी शाळेत सुरु झाले. पती गेल्याने अंबिकातार्इंच्या डोळ्यात सदैव अश्रू असायचे. आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल त्याची कल्पना न केलेली बरी. पिंपळगाव माळवीच्या मातेने एक वीर पुत्र गमावला. त्यांचे स्मरण समाजाला सतत राहवे म्हणून त्यांचे स्मारक गावात उभारण्यात आले आहे. गावात प्रवेश केला की या महान शहीद जवानाला वंदन केल्याशिवाय राहावत नाही.
अखेरचा निरोप...
१७ मे २०१५ रोजी त्यांचे पार्थिव पिंपळगाव माळवी येथे आणण्यात आले. तब्बल दीड महिने डोळे लावून बसलेल्या त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी यांनी त्यांचे पार्थिव पाहताच टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते. फुलांनी सजवलेल्या गाडीतून शहीद नारायण भोंदे यांची अंत्ययात्रा त्यांच्या वस्तीतून निघाली. रस्त्यांच्या दोन्ही मार्गांनी हजारोंचा जनसमुदाय जमला होता आपल्या लाडक्या नारायणला अखेरचा निरोप देण्यासाठी. लष्करी इतमामात १५ हजार लोकांच्या उपस्थितीत नारायण यांना निरोप देण्यात आला.

शब्दांकन - योगेश गुंड

 

Web Title: Shoora We Wandile: It was Datta till the end, Havaldar Narayanrao Bhonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.