राहात्यात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार; एकास पाठलाग करुन पकडले : दोन जण फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:23 AM2020-05-16T11:23:58+5:302020-05-16T11:24:24+5:30
राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान एका आरोपीस ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले आहे.
राहाता/शिर्डी : शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान एका आरोपीस ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी राहाता येथील गोदावरी कालव्यावरील पत्री पुलाजवळ वैभव ताठे या तरुणास या तीन आरोपींनी मारहाण केली होती. यावेळी या तरुणाकडील सहा हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. सदर आरोपी शुक्रवारी (दि.१५ मे ) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास याच परिसरात पल्सर मोटारसायकलवर फिरताना वैभव ताठे यास दिसून आले. ताठे याने याबाबतची माहिती आपल्या भावाला आणि सहकाºयांना दिली. त्यांनतर संबंधित सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने मदतीला धावून आले. त्यांनी आरोपीला घेरले. पल्सर मोटारसायकलवर असलेल्या तीन आरोपींनी मोटारसायकल तेथेच टाकून बाजूच्या शेतामध्ये पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत जमाव त्यांच्यामागे धावला. यावेळी आरोपीतील एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून जमावाच्या दिशेने गोळीबार केला. तर एकाने हातातील कोयता उगारला आणि परत पळ काढला. पळत असताना यातील हातात कोयता असलेला आरोपी शेतातील बांधला पाय अडकून पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला. तर दोघे आरोपी पळून जाण्याचा यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली आहे. नारायण म्हस्के असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्यास अटक आहे. त्याच्या विरोधात वैभव ताठे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस करीत आहेत.
फरार आरोपींचा शोध सुरू
राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत कंडारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाने पकडलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. दोन फरार आरोपींचा नागरिकांसह परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर घटनेची माहिती कळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. याप्रकरणी तपासाबाबत सूचना केल्या.