श्रीगोंद्यात कोरोना टेस्ट किट अन् लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:12+5:302021-04-14T04:19:12+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४७ जणांचा बळी गेला आहे. तालुका प्रशासन ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४७ जणांचा बळी गेला आहे. तालुका प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. पण कोरोना टेस्ट किट अन् लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनही मिळत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला असून, नागरिक हवालदिल झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांत दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यातील पारनेर येथून पारगाव येथील पाहुण्यांकडे आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर दुसरा मृत्यू टाकळी लोणार येथील ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला.
सोमवारी ५७५ रॅपिड अँटिजन चाचण्यात १२५ जण संक्रमित आढळले. गेले दोन दिवस घशातील स्रावांचे किट शिल्लक नसल्याने आरटीपीसीआर चाचण्या झाल्या नाहीत. सोमवारी उशिरा १५० आरटीपीसीआर किट आल्याने मंगळवारी संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या.
नगर येथून आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत २३ जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी तब्बल १४८ जण संक्रमित आढळले.
आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४ हजार १४८ झाली आहे. यामध्ये सद्यस्थितीला ५१३ रुग्ण सक्रिय आहेत. कोविड केंद्रात ९८, ग्रामीण रुग्णालयात २३, खासगी हॉस्पिटलमध्ये १८२ जण उपचार घेत आहेत. २१० जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. वडाळी येथील एका व्यक्तीची रॅपिड अँटिजन चाचणी दोनदा निगेटिव्ह आली. मात्र बारामती येथे उच्चस्तरीय तपासणी केली असता कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल आला. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
.......................
अवघे ४ टक्के लसीकरण
श्रीगोंदा तालुक्याची लोकसंख्या तीन लाख असून, अवघ्या १२ हजार नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणासाठी नागरिक आरोग्य केंद्रावर रांगा लावून उभे राहतात. पण लस मिळत नाही. लसीकरणाचे डोसेस वाढविण्याची गरज आहे.
..................
टेस्ट किट वाढवा
कोरोना टेस्ट किट कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांची वेळेवर कोरोना टेस्ट होत नाही. यामुळेही कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्मण झाला आहे. कोरोना टेस्टिंग किट वाढविण्याची मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.